मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग

भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग

शरद पवार

शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात येत असल्याने प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संबंधित कार्यक्रमात जाणं अपेक्षित होतं. पण....

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front) चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी देखील घडत आहेत. पण या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्न नेमकं कोण करेल? हा मुद्दा आता जास्त महत्त्वाचा आणि गडद होताना दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना केंद्रात विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करायचं आहे. ती भावना त्यांनी मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परषदेत बोलून दाखवली होती. दुसरीकडे शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे भाजप विरोधात विरोधकांची जी एकजूट होईल त्याचं नेतृत्व पवारांनी करावं, असं महाराष्ट्रातील काही नेत्यांचं मत आहे. अर्थात शरद पवार हे काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडीसोबत जाणार नाहीत, असं त्यांनी याआधीच व्यक्त केलं आहे. तर तिसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्या सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी काहीतरी वेगळंच राजकीय समीकरण उभं करण्याचं खुणावत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात नेमक्या काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चंद्रशेखर रावांनी प्रोटोकॉल मोडला, पंतप्रधानांना न भेटता बंगळुरुला रवाना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. ते तेलंगणाच्या हैदराबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. हैदराबादमधून ते चेन्नईसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान तेलंगणात वेगळ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात येत असल्याने प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संबंधित कार्यक्रमात जाणं अपेक्षित होतं. पण तेलंगणात आज वेगळंच काहीतरी घडलं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादला आले असताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे जेडीएसचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्या भेटीसाठी कर्नाटकात दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादला आले असतानाच राव यांचं देवगौडा यांच्या भेटीसाठी बंगळुरुला जाणं हे आगामी काळातील वेगळ्या राजकीय घडामोडी खुणावत असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. के चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यानंतर एचडी देवगौडा यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत भेटीची माहिती दिली. राव यांच्यासोबत देशातील महत्त्वाच्या विविध घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

(हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video)

के चंद्रशेखर राव यांना करायचंय देशाचं नेतृत्व

के चेंद्रशेखर राव यांची महत्त्वकांक्षा वाढली आहे. त्यांना देशाचं नेतृत्व करायचं आहे. त्यामुळे ते भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. या भेटीगाठीला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. ही सुरुवात त्यांनी थेट महाराष्ट्रापासून केली होती. के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही दिग्गज नेत्यांसोबत भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप विरोधात देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याते संकेत दिले होते. यासाठी अनेक नेत्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत.

के चंद्रशेखर राव आतापर्यंत कुणाकुणाला भेटले?

के चंद्रशेखर राव यांनी 21 मे रोजी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्याआधी त्यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी तामिळाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेतली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यांनी 4 मार्च 2022 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी मार्च महिन्यात सुब्रमण्यम स्वामी आणि राकेश तिकैट यांचीदेखील भेट घेतली होती.

तिसऱ्या आघाडी शरद पवार राहणार की नाहीत?

तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. के चंद्रशेखर राव यांची महत्त्वकांक्षा पाहता तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसला करता येणार नाही. पण काँग्रेसला ज्या आघाडीचं नेतृत्व करता येणार नाही त्याआघाडीच्यासोबत काँग्रेस जाण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय काँग्रेस सोडून शरद पवार कोणत्या आघाडीसोबत जाणं, सध्यातरी कठीण आहे. त्यामुळे ही तिसरी आघाडी खरंच स्थापन होते का, आणि त्या आघाडीत कोणकोणते पक्ष राहतील, ती आघाडी यशस्वी होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:
top videos