मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या पाठीमागे आज ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे. ईडीने आज त्यांचं वांद्रे (Bandra) येथील निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी धाडी (raid) टाकल्या आहेत. ईडीने आज सकाळी धाड टाकली तेव्हा अनिल परब आपल्या वांद्रे येथील निवासस्थानी नव्हते. पण या धाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली असताना शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या घरावर अशाप्रकारे ईडीने धाड टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. विशेष म्हणजे ईडीची कारवाई सुरु असताना वांद्र्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनिल परब यांच्या वांद्र्याच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घडामोडी आता नेमक्या कुठे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथील निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर थांबून आंदोलन केलं होतं. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. आता अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये काही विपरीत घटना घडणार तर नाही ना? अशी भीती काही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी वाढती गर्दी पाहता आणखी फौजफाटा वाढवला आहे. ( “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी” ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य ) शिवसैनिकांच्या हाताला काळ्या फिती ईडीचे अधिकारी आज सकाळपासून अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरात झडती घेत आहेत. त्यांची गेल्या दहा तासांपासून झडती सुरु आहे. शिवसेनेचा बडा नेता असलेल्या राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या घरावर अशाप्रकारे धाड पडल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर आता शिवसैनिकांची गर्दी जमायला लागली आहे. या शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधल्या आहेत.
VIDEO : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video #ShivSena #bandra #AnilParab pic.twitter.com/W1Q8RRSkXo
— News18Lokmat (@News18lokmat) May 26, 2022
शिवसैनिकांची नेमकी भूमिका काय? “अनिल परब यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे. याच कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी जमलेलो आहोत. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. काय चाललंय, आणि शिवसेनेची कशाप्रकारे कुचंबना करण्याचे प्रयत्न सुरु आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय”, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.