जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोनिया गांधींच्या प्लॅनिंगला पवारांनी दिला धक्का, राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार

सोनिया गांधींच्या प्लॅनिंगला पवारांनी दिला धक्का, राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार

सोनिया गांधींच्या प्लॅनिंगला पवारांनी दिला धक्का, राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपदासाठीच्या उमेदवारीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रपतीपदासाठी (President Election 2022) विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरु होती. पण माकप नेते सीताराम येचुरी यांनी शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही. आम्ही दुसऱ्या नावांचा विचार करत असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री आहेत, तसेच त्यांच्या पाठिशी एवढा मोठा राजकीय अनुभव असताना विरोधी पक्षाकडून त्यांचं राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून नाव कसं डावललं गेलं? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपदासाठीच्या उमेदवारीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. “राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांचा प्रस्ताव सर्वानुमते देण्यात आला होता. पण त्यांनी तो प्रस्ताव नाकारला”, असं ममता म्हणाल्या. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील प्रचंड आग्रही होत्या. पण पवारांनी तो प्रस्ताव नाकारल्याने त्यांनी सोनिया गांधी यांच्या प्लॅनिंगला मोठा झटका दिल्याचं मानलं जात आहे. सोनिया गांधी यांचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत नेमका प्लॅन काय होता? मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार जर विरोधी पक्षाचे उमेदवार होणार असतील, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यामुळे विरोधी पक्षाची वाट आणखी सोपी होईल, असा सल्ला दिला. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्हावे, अशी विनंती केली होती. पण, शरद पवार हे सहसा कोणताही धोका पत्कारून असा निर्णय लगेच घेणार नाही.

जर शरद पवार हे विरोधी गटातून उमेदवार म्हणून जर समोर आले तर त्यांना ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आणि स्टॅलिन, हेमंत सोरेन यांच्यासह सर्वच स्तरातील नेते सहज पाठिंबा देतील. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास एकवेळेस नकार देतील पण शरद पवार यांना लगेच पाठिंबा दर्शवतील. तर दुसरीकडे, वाईएसआर आणि बीजू जनता जल हे काँग्रेसच्या राजकीय रणनीतीला सुरूंग लावण्याची जास्त शक्यता आहे. जर शरद पवार यांना विरोधी आघाडीकडून जर उमेदवारी देण्यात आली तर या दोन्ही पक्षांसोबत संवाद साधणे आणखी सोपे होणार आहे. पण अजूनही बीजू जनता दल आणि वाईएसआर हे काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक असल्याचे चित्र आहे. पण, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी होकार कळवता की नकार कळवता, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. ममता बॅनर्जींनी राष्ट्रपतीपदासाठीच्या बोलावलेल्या बैठकीत सहभागी झालेले पक्ष आणि नेत्यांची नावे : 1. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, रणदीप सुरजेवाला आणि जयराम रमेश 2. TMC कडून स्वत: पक्षाध्यक्षा ममता बनर्जी 3. आरजेडीकडून खासदार मनोज झा 4. सीपीएमकडून ई करीम 5. सीपीआईहून बिनॉय विश्वम 6. JDS कडून HD देवेगौडा आणि कुमारस्वामी 7. डीएमकेकडून T R Balu 8. शिवसेनाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि सुभाष देसाई 9. समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव 10. PDP कडून महबूबा मुफ्ती 11. IUMLकडून ई टी मोहम्मद बशीर 12. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार 13. RSPकडून N K प्रेमचंद्रन 14 . RLD कडून जयंत चौधरी 15. सीपीआईएमएलकडून दीपांकर भट्टाचार्य 16. नॅशनल कांफ्रेंसकडून उमर अब्दुल्ला आईटी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत आकड्यांचं गणित नेमकं काय? राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य मतदान (President Election process) करतात. 245 सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेमधील 233 खासदारच मतदान करू शकतात. या वर्षी मात्र जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित असल्यामुळे, काश्मीर कोट्यातली चार राज्यसभा जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यसभेतील एकूण 229 खासदारच या निवडणुकीत मतदान करू शकतील. लोकसभेतील सर्व 543 सदस्य मतदानात सहभागी घेतील. ज्या जागांवर पोटनिवडणुका होत आहेत अशा सदस्यांनाही मतदान करता येईल. यासोबतच सर्व राज्यांचे एकूण 4,033 आमदार देखील या निवडणुकीत मतदान (President Election number game) करतील. अशा रितीने एकूण 4,809 लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते. जर सर्व मतदारांच्या मताचे मूल्य एकत्रित केले, तर एकूण मतसंख्या 10 लाख, 86 हजार 431 होते. यातील अर्ध्याहून अधिक, म्हणजेच 5,43,216 मूल्यांची मते मिळालेल्या उमेदवाराची निवड राष्ट्रपतिपदावर केली जाईल. ( ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाठ, देशभरातील 16 नेत्यांचा सहभाग ) भाजपच्या नेतृत्त्वात उभारलेल्या एनडीएकडे सध्या 5,35,000 मूल्यांची मतं आहेत. यामध्ये जेडीयू, एआयडीएमके, अपना दल (सोनेलाल), एलजेपी, एनपीपी, निषाद पार्टी, एनपीएफ, एमएनएफ, एआयएनआर काँग्रेस अशा एकूण 20 लहान पक्षांचा सहभाग आहे. या आकडेवारीनुसार एनडीएला (NDA Vote count) ही निवडणूक जिंकण्यासाठी अवघ्या 13 हजार मतांची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या यूपीएकडे (UPA Vote count) सध्या 2,59,892 मूल्यांची मतं आहेत. यामध्ये शिवसेना, डीएमके, आरजेडी, एनसीपी अशा पक्षांच्या मतांचाही समावेश आहे. तर यूपीए व्यतिरिक्त टीएमएसपी, सपा, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, डावे पक्ष अशा विविध विरोधी पक्षांकडे मिळून एकूण 2,92,894 मूल्यांची मतं आहेत. हे सगळे विरोधी पक्ष जर एकत्र आले, तर एकूण मतांपैकी 51 टक्के मताधिक्य त्यांच्याकडे होऊ शकतं, जे एनडीएसाठी अडचणीचं ठरेल. दरम्यान, आजपासून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची मुदत सुरू होत आहे. असं असताना अजून विरोधीपक्षांचा उमेदवारच ठरला नसल्याची स्थिती आहे. तसेच एकूण मतांचे मूल्य पाहता सध्या एनडीएचं पारडं झुकलेलं दिसत आहे. सर्व लहान पक्षांना रुचेल असा उमेदवार उभा करून, विरोधी पक्षांची सर्व मते एकत्र करण्याचं अवघड काम जर विरोधकांना शक्य झालं; तर ते एनडीएसाठी अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत काय होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात