मुंबई, 26 एप्रिल : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निमित्ताने होती अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यासोबत रिफायनरीवरून सुरु असलेल्या वादावरही चर्चा झाल्याचं सांगितलं. शरद पवार म्हणाले की, उद्योग मंत्र्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. बारसू इथं आंदोलनावेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याची माहिती समजलीय. लोकांना समजून सांगितल्यावर विरोध नाही असंही सामंत यांनी सांगितलंय. बारसूबाबत काही घाईने करू नका असा सल्ला शरद पवार यांनी उदय सामंत यांना दिला. तसंच उद्या आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करू असं आश्वासनही पवारांनी दिलं. शरद पवार यांची भेट बारसु संदर्भात नव्हे तर…; मंत्री उदय सामंत यांनी केला खुलासा राज्यात अजित पवार यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यांची भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पोस्टर्सही लावली जात आहेत. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, असा वेडेपणा करू नका असं अनेकदा सांगितलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होईल असे विधान अनेकदा केले. याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहिती नाही. संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल. बारसू इथं रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातच दिला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. पण असा काही प्रस्ताव नाही आणि ही टेबल न्यूज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी पत्र काय लिहलं मला माहिती नाही. पण कुठल्याही प्रकल्प होताना स्थानिकांचे मत लक्षात घेतलं गेलं पाहिजे असेही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.