मुंबई, 19 मार्च : मनसेचा गुढीपाडवा मेळावा 22 तारखेला होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या शिवाजी पार्कमध्ये सुरू आहे. आज मनसे नेत्यांकडून शिवाजी पार्कमध्ये व्यासपीठाचं पुजन करण्यात आलं आहे. सोबतच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. हा टीझर मनसेच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी… चला शिवतीर्थावर !’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. काय आहे टीझरमध्ये? नव्या टीझरमध्ये पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करण्यात आला आहे. हीच बाळासाहेबांची देखील इच्छा होती, राज ठाकरे यांच्या यशस्वी आंदोलनामुळे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.
पहिल्या टीझरमध्ये काय? दरम्यान यापूर्वी देखील मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचा एका टीझर जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीलाच हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील, असं लिहिण्यात आलं आहे. यानंतर राज ठाकरेंचं भाषण या व्हिडिओमध्ये लावण्यात आलंय. ‘माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन,’ असं राज ठाकरे म्हणत आहेत. ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

)







