पुणे, 22 नोव्हेंबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये एबीव्हीपी प्रणित विद्यापीठ विकास मंच पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. विद्यापीठ विकास मंच पॅनलचे 6 उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे चूलत बंधू प्रसेनजित फडणवीस यांचाही समावेश आहे. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजित फडणवीस यांना 4,447 मतं पडली, तर याच प्रवर्गातून 3,711 मतांसह सागर वैद्य हेदेखील विजयी झाले. सिनेट निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास मंचचे फडणवीस आणि वैद्य यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय झाला. मंगळवारी संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे निकाल जाहीर झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे 13 हजार 512 मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13 हजार 995 मतं मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे 14 हजार 101 मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे 13 हजार 342 मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर 15 हजार 649 मतांनी विजयी झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील 300 हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. 500 सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. एबीव्हीपी प्रणित विद्यापीठ विकास मंचचे विजयी उमेदवार प्रसेनजित फडणवीस सागर वैद्य गणपत पोपट नांगरे विजय निवृत्ती सोनवणे सचिन गोर्डे बागेश्री मंठाळकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.