सातारा, 03 नोव्हेंबर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावागावातून सध्या साखर कारखान्यावर ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. दिवाळी सण संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याची धुराडी पेटू लागली आहे. कराड, पाटण, कोरेगाव, सातारा येथे साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी कामगार सहकुटुंब रवाना होत आहेत. त्यामुळे गजबजलेली गावं आता ओस पडू लागली आहेत. सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात ठोस उद्योगधंदे, शेतीपासूनचे शाश्वत उत्पन्न नाही. रोजंदारीसाठी नागरिकांना बाहेर जावं लागते. म्हसवड, पळशी, झाशी, धामणी, हिंगणी, वडजल, या गावातील कामगार ऊस तोडणीसाठी बाहेरगावी निघाली असल्यानं गावे ओस पडत आहेत. या भागातील नागरिक पिढ्यानपिढ्या ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर जातात. ऊसतोडणीशिवाय पर्याय नाही सततचा दुष्काळ पाण्याअभावी नापीक असलेली जमीन. आणि पाऊस झालाच तर खातरीशीर उत्पन्न निघेल याची इथल्या शेतकऱ्यांना शाश्वती नाही. त्यामुळे येथील अनेक अल्पभूधारक शेतकरी, मजूर, कामगार ऊसतोडणीवर जाण्याचा पर्याय निवडतात. येथील परिसरात हाताला काम मिळण्यासाठी इतर कोणतीही औद्योगिक वसाहत, उद्योग उभा राहिलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ऊसतोडणीसाठी स्थलांतर करण्याची वेळ येते. सण उत्सवात प्लास्टिक फुलांचाच बोलबाला, शेतकरी संकटात, पाहा Video धान्याची रसद भरलेले पेटारे सध्या गावागावात साखर कारखान्याची वाहने ऊस तोडणी कामगारांचा पसारा भरून घेऊन जाण्यासाठी उभी आहेत. तर काही वाहने कारखान्याच्या दिशेने रवाना झालेली पाहायला मिळत आहेत. गावाकडून जातानाच ज्वारी, बाजरी, कडधान्य, चटणी मसाला असे अन्न धान्याची रसद भरलेले पेटारे घेऊन ही कुटुंब निघाली आहेत. Video : बहरलेल्या द्राक्ष बागेची बोली लागली, भावही ठरला! पण रात्रीत… उसाचे वाडे विकून उदरनिर्वाह काही कामगारांनी कारखान्यावर जायच्या अगोदरच उचलीचे पैसे घेऊन घर खर्चासाठी संपवून टाकले आहेत. त्यांना ऊसतोडणी करून उसाचे वाडे विकून आलेल्या पैशावरच उदरनिर्वाह करावा लागणार आहे. मात्र, ही ऊसतोडणी सुरू होईपर्यंत पदरमोड करून गुजराण करावी लागणार आहे. काही जण ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या घेऊन जातात. मात्र अलीकडच्या काळात बैल जोड्या लोप पावत चालल्याने ट्रॅक्टरला जोडलेली बैलगाडी सदृश गाडी जोडून वाहतूक करण्यात येते. गुऱ्हाळ घरावर कामाला जाणारा वर्ग वेगळा कोल्हापूर, कराड, पाटण, पाडेगाव, नीरा ,फलटण या भागातील ऊस पट्ट्यात गुऱ्हाळ घरे मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा पाडेगाव या भागात दिवाळी पूर्वी गुऱ्हाळे सुरू असतात तिथला हंगाम संपला की कराड, पाटण, कोल्हापूर भागात हे कामगार जातात. कारखान्यावर ऊसतोडणीची मजुरी टनावर मिळते तर गुऱ्हाळावर आदनावर मिळते, गुऱ्हाळावर गुळवे, मळवे, जाळवे, घाणेकरी, यांना ऊसतोडणीत काम मिळते. हाही वर्ग स्थलांतरित होऊ लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.