सातारा, 04 फेब्रुवारी : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक झाल्याने एका युवकाने आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील कोळे गावातील दयानंद बाबुराव काळे युवकाने व्हाट्सअप स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सैन्य दलात जवान असलेला त्याचा चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कराड पोलिसांकडे मृताचा भाऊ शिवानंद बाबुराव काळे यांनी प्रदीप विरोधात फिर्याद दिली आहे. दयानंद याचा चुलत भाऊ प्रदीप काळे हा सैन्य दलात कार्यरत आहे. प्रदीप प्रमाने दयानंदही भरतीसाठी प्रयत्न करत होता. या दरम्यान प्रदीपने मला फोन करून दयानंदला सैन्य दलात भरती करतो, असे सांगितले. दीड लाख रुपये द्या. पंधरा दिवसात सैन्य दलात भरती झाल्याचे नियुक्तीपत्र येईल, असे सांगून पैशाची मागणी केली. त्यानुसार वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन 9 लाख रूपये दिले.
हे ही वाचा : VIDEO: 80 पेक्षा अधिक वर्षे जगतात या ठिकाणाचे लोक, काय आहे कारण?
मागच्या काही महिन्यांपासून प्रदीप दयानंदला शब्द देत होता. पावसाळा संपला की तुला ट्रेनिंगला बोलवतील, असे तो वारंवार सांगायचा. काही दिवसानंतर प्रदीप हा घराच्या वास्तुशांतीसाठी सुट्टीवर गावी आला होता. त्यावेळी शिवानंद व त्याच्या वडिलांनी प्रदीपला दयानंदच्या भरतीबाबत विचारणा केली असता थोडे दिवस थांबा माझे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे सांगून वेळ मारून नेत होता.
भरतीला विलंब होत असल्याचे पाहून दयानंदने प्रदीपला फोन करून ट्रेनिंगला कधी जायचे आहे ते सांग नाहीतर मला माझे पैसे परत दे, असा इशारा दिला. परंतु प्रदीप थोडे दिवस थांब तुझे काम होईल असे सांगून वेळ घालवत होता.
पैसे देऊनही भरतीचे काम होत नसल्याने दयानंदची अस्वस्थ होत होता. यामुळे तो वारंवार तणावात जात होता. कुटुंबीयांनी प्रदीपकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. दयानंदने प्रदीपला फोन केला असता तू मला दिलेल्या शिव्या ऐकून आमच्या अधिकार्यांनी तुझी फाईल फाडली, असे प्रदीपने सांगितले. तसेच 2 लाख 90 हजार रुपयांचा चेक दिला. नंतर नोकरी आणि उर्वरीत पैशाबाबत प्रदीप विषय टाळू लागला. त्या तणावामुळे दयानंदने खाणे पिणे सोडले.
फसवणूक झाल्याने दयानंद तणावात गेला. सतत रडायचा. माझी फसवणूक झाली. मला आता जगू वाटत नाही, असे म्हणायचा. कुटुंबीय त्याची समजूत काढत होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. दयानंदने शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा : पत्नी कर्ज काढून देत नाही म्हणून पतीने घेतला तिच्या नाकाचा चावा, धक्कादायक प्रकार समोर
कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल पाहिला असता प्रदीप काळे याने भरती करतो म्हणून घरच्यांकडून नऊ लाख रुपये घेऊन मला फसविले आहे. संपूर्ण पुरावा माझ्या मोबाईलमध्ये आहे. गावातील काही मुलांना देखील असेच अमिष दाखवले आहे. मी टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण प्रदीप आहे, असा स्टेटस ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप काळे याला ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Satara, Satara (City/Town/Village), Satara news