जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / त्या बारचं सीसीटीव्ही चेक करा, फडणवीसांना पत्र लिहून राऊतांचा खळबळजनक आरोप

त्या बारचं सीसीटीव्ही चेक करा, फडणवीसांना पत्र लिहून राऊतांचा खळबळजनक आरोप

संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईतल्या बारमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी दारू पिऊन राडा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 मे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईतल्या बारमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी दारू पिऊन राडा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं असून, या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज चेक करावं, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे संजय राऊतांचं पत्र? शनिवार, दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी पहाटे लिंक रोड, खार पश्चिम येथे घडलेल्या घटनेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. मुंबईत रेस्टॉरंट आणि बार साधारण 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना रेडिओ बार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जॅम झाले, म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या आणि त्यांच्या गराड्यात भाजप नेते मोहित कम्बोज मद्यधुंद अवस्थेमध्ये होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले. मोहित कम्बोज वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्च पद्धतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. हिंमत असेल तर मला इथून बाहेर काढून दाखवा, मी आता देवेंद्रला फोन करतो बघा. असं तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला. पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कम्बोज त्याही अवस्थेत दारू पित होते. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कम्बोज वारंवार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा उल्लेख करत असल्याने पोलिसही दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. रेडिओ बार अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसंच पिकअप पॉईंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती. भाजपचे नेते तिथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावत होते. ही बाब गंभीर आहे. खार पश्चिमेला रेडिओ बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित रेडिओ बारचा परवाना रद्द करावा.ठ

जाहिरात

गृहमंत्री म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने मी ही तक्रार करत आहे, असं पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. ऑस्कर जिंकणाऱ्या ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी वेळ संपल्यामुळे अर्ध्यात थांबवला, पण दुसरीकडे मुंबई भाजपचा नेता बारमध्ये रात्री 3.30 वाजेपर्यंत नाचत होता. देवेंद्र फडणवीस कायदा सगळ्यांसाठी सारखा नाही का? कायद्यापेक्षा तुमचे नेते मोठे आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात