मुंबई, 4 मार्च : संजय राऊत आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. सध्याच्या काळात पंत छत्रपतींची नियुक्ती करतात आणि छत्रपती पंतांचे चेले झाले आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी उदयनराजेंवर केली होती. संजय राऊतांच्या या टीकेला उदयनराजेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे विकृत राजकारणी आहेत. राऊतांनी केलेलं विधान निर्लज्ज पणाचा कळस आहे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे. आमच्या घराण्यामुळे राऊतांचा पक्ष उभा असल्याचंही उदयनराजे म्हणाले आहेत.
'छत्रपती पेशव्यांना नेमत होते, आता पंत नेमणुका करायला लागले आहेत. हे काही महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानाची गादी आहे, त्यांनी भाजपसोबत तडजोड केली. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला कदापी मान्य होणार नाही,' असं संजय राऊत म्हणाले.
'काही विषय नसला तर या घराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे, थोडी लाज तरी राखा,' अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे.
राऊतांनी केली पवारांची कॉपी
संभाजीराजे छत्रपती जेव्हा राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर गेले होते, तेव्हा शरद पवारांनीही अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. 'आधी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे, पण आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात,' असं विधान शरद पवारांनी 2016 साली केलं होतं. शरद पवारांच्या या विधानावरून तेव्हा वाद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.