सांगली, 20 मार्च : जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याआधी ताड यांच्या हत्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ताड यांचे भाऊ विक्रम ताड यांनी या प्रकरणी पोलिसात दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. सांगली पोलिसांनी या प्रकरणी गोकाकमधून चौघांना अटक करत खून प्रकरणाचा उलगडा केलाय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय ताड यांची शुक्रवारी १७ मार्च रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता ५ जणांची नावे समोर आली असून यात भाजपच्या माजी नगरसेवकाचा समावेश आहे. हत्या प्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत हे मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय. यातील चौघांना कर्नाटकातील गोकाकमधून अटक करण्यात आलीय. तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत.
Whatsapp स्टेटसला स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली अन संपवलं जीवन, 4 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. तेव्हा सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हयात खळबळ उडाली होती.
हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. यापप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून करणाऱ्या चौघा जणांना अटक केली आहे. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने,आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयिताची नावे आहेत. तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत,अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangli