सांगली, 31 डिसेंबर : सांगली जिल्ह्यात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. मोबाईल चोरी, सायकल चोरी, रस्त्यावरील जनावरांची चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सशस्त्र दरोडा टाकला गेला असून दगडफेक करत गाडी अडवून चाकूच्या धाकाने महिलांकडील सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांबरोबर झालेल्या झटापटीत कारमधील 2 जण जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. कोल्हापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या विठ्ठल भक्तांची गाडी आगळगाव फाट्यानजीक दगडफेक करत चार ते पाच चोरट्यांनी अडवली. चाकूच्या धाकाने महिलांकडील 25 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटला.
महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेन संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली. पोलिसांच्या श्वान पथक कुची जाखापुर परिसरात घुटमळले.
एका तंबाखूच्या पुडीने उकललं महिलेच्या हत्येचं गूढ; पतीच निघाला आरोपी
झटापटीत दोघे जखमी
या प्रकरणी वकील असलेल्या भाग्यश्री विलास पाटील (वय 28 रा. सरनोबतवाडी कोल्हापूर) यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत माधवी जनार्दन जाधव (वय 25 रा. कोल्हापूर) आणि विकास परशुराम हेगडे (वय 22रा. कोल्हापूर हे दोघे जखमी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.