स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 19 जून: कोयना धरणातील अपुरा पाणीसाठा आणि पावसानं दिलेली ओढ यामुळं सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी खालावत चालली आहे. सांगली शहरावर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालंय. पाणी पातळी खालावल्याने सांगली महापालिकेनं सांगलीकरांना उपलब्ध पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलंय. दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी खालावल्याने नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. हातातोंडाशी आलेली पिके आणि भाजीपाला सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सांगलीवर पाणी संकट राज्यात मान्सून लांबला आहे. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पाणी साठा अत्यंत कमी झाला आहे. सध्या असलेल्या पाणी साठ्यापैकी निम्मा साठा हा मृत संचय आहे. त्यामुळे हे पाणी वापरता येणार नाही. जिल्ह्यातील तलाव, विहिरी आणि कुपनलिकांनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट उभे आहे. परिणामी जलसंपदा विभागाने कृष्णा काठावर उपसाबंदी लागू केली आहे. तसेच सांगली महापालिकेने नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलं आहे.
नदी काठची पिके होरपळ्याची शक्यता पाणी टंचाईचा मोठा फटका हा नदी काठच्या शेतीला बसणार आहे. ऊस, भाजीपाला, सोयाबीन, केळी ही पिके धोक्यात आली आहेत. सिंचन योजनांमुळे कशीबशी तगलेली पिके होरपळण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर सांगलीचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. तो पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे. उच्चशिक्षित वारकरी पंढरपूरला उलटं चालत का जात आहे? पाहा Video पुढील काही दिवस पाणी कपात पावसाळा लांबल्यामुळे व धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने कोयना धरणातून केवळ 1 हजार 50 क्युसेक्स इतकाच विसर्ग सुरू आहे. सध्या कोयना धरणात 12.37 टी.एम.सी. आणि वारणा धरणात 11.76 टी.एम.सी. इतका पाणीसाठी आहे. कोयना व वारणा धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. महापालिका क्षेत्रात पुढील काही दिवस पाण्यात कपात होणार आहे.