आसिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली 21 जुलै : जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गुळदगड (वय 45 रा.शेवते ता.पंढरपूर जि. सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघेजण गेले होते. यावेळी विजेचा शॉक बसला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून पाण्याची सोय केली आहे. माडगुळे येथील सोमनाथ विभुते आणि मधुकर विभुते यांच्यासह चार पाच जणांची सामुदायिक पाइपलाइन आहे. तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागत आहे. VIDEO - वाशिष्टी-शिव नदीच्या पुरानंतर चिपळूणमध्ये नवं संकट; नागरिकांनो कृपया करू नका असं धाडस गुरुवारी दुपारी सोमनाथ विभुते यांनी अनिकेत विभुतेला ही मोटर पाण्यात सोडण्यासाठी जाऊ, असं सांगण्यासाठी फोन केला. यावेळी अनिकेतने मी आटपाडी येथे आहे. तुम्ही येऊ नका मी मोटर बसवतो असं सांगितलं. त्यानंतर अनिकेत विभुते हा पंढरपूर तालुक्यातील शेवते गावातून आलेल्या विलास गुळदगड आणि सखाराम पाटील या नातेवाइकांना घेऊन तलावावर गेला. सखाराम पाटील हे बांधावर थांबले. तलावाच्या बांधावरून अनिकेत विभुते आणि विलास गुळदगड यांनी विद्युत मोटर पाण्यात ठेवली. यावेळी दोघांना अचानक विजेचा शॉक बसला आणि ते पाण्यात पडले. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.