सांगली, 19 जून: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमधल्या अॅपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. रुग्णांची हेळसांड करून तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका डॉ. महेश जाधव याच्यावर आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग जाधवला रात्री पकडले. आता अपेक्स हॉस्पिटल रुग्णालयातील 87 रुग्णाच्या डेथ ऑडिटची पोलिसांना प्रतीक्षा आहे. (Apex care hospital director dr mahesh jadhav arrested)
व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून या हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय पथक ऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला याशिवाय भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
पुढील चौकशीसाठी डॉ. जाधव याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच तो पलायन करत असताना त्याला पकडण्यात आले, असे पोलिसांनि सांगितलं.
हेही वाचा- मोठी अपडेट: मुंबई लोकलसंदर्भात पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
डॉ. जाधव याने मिरज-सांगली रस्त्यावर अॅपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरू केले होते. हॉस्पिटलमध्ये पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 205 रुग्णांना दाखल करून घेतले होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ. जाधव याने भरमसाट बिलांची आकारणी केली, तसेच डिस्जार्च झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मागविण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या.
याशिवाय कोरोना उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद ठेवण्यात आले होते . यामुळे या हॉस्पिटल मधील कारभारावर अधिकच संशय बळावला होता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.