सांगली, 27 एप्रिल : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आला आणि त्यातून ते जमिनीवर पडले. या अपघआतात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संभाजी भिडे यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची बोलण्याची शैली अनेकांना भावते. त्यामुळे भिडे गुरुजींच्या अपघाताची बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे. भिडे गुरुजींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्वांकडून केली जात आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. भिडे गुरुजी आजही सायकलनेच प्रवास करतात. त्यामुळे अनेकांना या गोष्टींचं अप्रुप वाटतं. संभाजी भिडे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळेही प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला आहे. कोरोनाच्या काळात ‘कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत. मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही’, असं धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केलं होतं. ( दोन मुलांची आई होती Shari Baloch, पाक आणि चीनला आव्हान देणारी Suicide Bomber कशी वळली या टोकाला? ) संभाजी भिडे नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मिरजेत काल शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी देशातील 123 कोटी नागरिकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा असला पाहिजे, असं विधान केलं होतं. संभाजी भिडे यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगायची झाली तर त्याचं मनोहर असं मूळ नाव आहे. ते सांगतील राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एकेकाळचे प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत. संभाजी भिडे हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. पण संघातील काही जणांशी वाद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली होती. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे गुरुजींची संघटना राज्यभरात चर्चेत आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.