मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हो, माझ्याकडे लायसन्स असलेली पिस्तूल, 30-40 जणांनी हल्ला केला, मग...', सदा सरवणकरांनी सांगितली Inside Story

'हो, माझ्याकडे लायसन्स असलेली पिस्तूल, 30-40 जणांनी हल्ला केला, मग...', सदा सरवणकरांनी सांगितली Inside Story

आमदार सदा सरवणकर

आमदार सदा सरवणकर

गणपती विसर्जनावेळी मुंबईच्या प्रभादेवी परिसरात दादरचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 11 सप्टेंबर : गणपती विसर्जनावेळी मुंबईच्या प्रभादेवी परिसरात दादरचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली होती. सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत. त्यांच्या समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये गणपती विसर्जणावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवत दमदाटी केल्याचीदेखील माहिती समोर आली होती. या सर्व राड्यानंतर सरवणकर यांनी स्वत:हून प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. आपण प्रभादेवी चौकात गेलो होतो, पण बंदुक घेवून गेलो नव्हतो. तसेच आपल्याकडे परवाना असलेली बंदुक आहे. पण पोलिसांची सुरक्षा असल्याने परवानाधारक पिस्तूलची मला गरजच नाही, असं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं आहे.

"माझ्याकडे लायसन्सची पिस्तूल आहे. पण माझ्याबरोबर पोलीस फौज असताना मला अशाप्रकारची काय गरज आहे? बंदुक हातात घेतलेला जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्याबाबत मला काहीच कळत नाही. सोशल मीडिया हा माझा अज्ञानाचा भाग आहे. मी तशाप्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही. पोलिसांवर कुणी दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास सांगत असतील तर पोलीस योग्य तपास करतील. मी जे गुन्हे केले नाहीत ते दाखल करणे योग्य नाही", असं आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलं.

सदा सरवणकर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं....

"प्रत्येकवर्षी विसर्जनासाठी येणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत केलं जातं. पुष्पहार आणि फुलं वाहिली जातात. हे आपण गेले कित्येक वर्षांपासून करतोय. त्यानुसार यावर्षी देखील शिवसेनेकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलं. एका बाजूला मनसेचं स्वागत कक्ष होतं. दुसऱ्या बाजूला नव्यानेच दुसऱ्या एका शिवसेनेचं होतं. त्यामुळे मी तिथे फार उशिरा आलो. सुरुवातीपासून एकमेकाला वेगवेगळ्या प्रकाराचे हावभाव करणं, अशा प्रकारचं काहीतरी चाललं होतं. खरंतर हे व्हायला नको होतं. पण दुर्दैवाने घडलं. आपल्या हिंदूंचा सण उत्साहात करा, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. कोणतेही निर्बंध लावू नका, असे आदेश दिले होते. त्यामुळे सणासुदीला अशाप्रकारे एकमेकांना डिवचण्याचे जे प्रकार घडले ते घडायला नको होते. पण मी ज्यावेळी तिथे गेलो तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मला रात्री काम बंद करण्यास सांगितलं. त्यावेळी मी आमच्या कार्यकर्त्यांसोबत तिथून निघून आलो", असं सदा सरवणकर म्हणाले.

(दादरमध्ये शिवसैनिक भडकले, सदा सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक, पोस्टरही फाडले)

"काल रात्री बारा वाजता आमचा शाखा प्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने महेश सावंत, शैलेश माळी आणि चंदन साळुंखे, विनायक देवरुखकर अशा सगळ्या मंडळीने हल्ला केल्याची बातमी मिळाली. त्यानंतर मी निघालो. मी घटनास्थळी गेलो. त्यानंतर तिथून पोलीस ठाण्यात गेलो. खरंतर ही एकच कुटुंबातील आणि एकत्र राहणारी मुलं आहेत. अशा प्रकारचा वाद करणं योग्य नाही. मात्र, ते दुर्दैवाने झालं. मी विनंती करतो की, सणासुदीला एकमेकांना डिवचून वाद घालून आपले समस्त हिंदू बांधव दुखी होतील, असं घडायला नको", असं आवाहन सरवणकर यांनी केलं.

"गणपती विसर्जणाच्या ठिकाणी एकमेकांवा डिवचलं जात होतं. तो वाद तिथपर्यंतच मर्यादीत राहणं अपेक्षित होतं. त्याचा राग मनात ठेवून संबंधित व्यक्तीवर वैयक्तीकपणे 30 ते 40 जणांना घेवून जावून हल्ला करणं योग्य नाही. रात्री बारा-सव्वा बारा वाजता संबंधित प्रकार घडला", असं सरवणकर यांनी सांगितलं.

'हो..आम्ही प्रभादेवी चौकात गेलो होतो, पण...'

"आम्ही रात्री सव्वा बारा वाजता दोघेजण होतो. आम्हाला माहिती मिळाली की चाळीस ते पन्नास जण संतोष तेलवणेला मारहाण करत असल्याचं समजलं. त्यावेळी माझ्यासोबत ड्रायव्हरी नव्हता. तरीही आम्ही दोघंजण प्रभावदेवी चौकात गेलो होतो हे खरं आहे. कारण महेश आणि मी, आम्ही एकत्र लहाणाचे मोठे झालो आहोत. आमचं काही खान्दानी दुश्मणी नाही. आम्ही प्रकरण शांत करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत पोलीस अधिकारीदेखील होते", असं त्यांनी सांगितलं.

बंदुकीने गोळीबार केला असा आरोप होतोय, तो खराय?

"मी या भागातला आमदार आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करतोय. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जातेय. त्याचाच हा भाग आहे. मी कामाने मोठा झालेला आमदार आहे. मी भांडणं करुन मोठा झालेलो नाही. या मतदारसंघात प्रत्येक गल्लीबोळ्यात आमची कामं दिसतील. समोरच्या लोकांकडे काम करण्यासारखं काही नाही, सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे मला थांबवणं हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे माझ्यावर असा आरोप केला जातोय", असं स्पष्टीकरण सरवणकर यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं?

"या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली नाही. कारण मला फारसं तसं काही घडलेलं नाही. ज्यांनी हल्ला केला होता त्यांच्यावर योग्य कारवाई केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही तिथून निघून आलो होतो", अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.

First published:

Tags: Shiv sena, Uddhav Thackeray