मुंबई, 11 जून: दोन दिवसांपूर्वी काँग्रेसला (Congress) चांगलाच फटका बसला आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. आता शिवसेनेनं प्रसाद यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana Editorial)अग्रलेखात भाष्य केलं आहे. शिवसेनेनं या अग्रलेखात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाबद्दल राजकीय सल्लाही दिला आहे. तसंच पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद यांचं पक्षांतर झाल्याचा मुद्दा शिवसेनेनं सविस्तर मांडला आहे.
काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं काँग्रेसला दिला आहे.
हेही वाचा- न्यायालयाकडून दिलासा पण... परमबीर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा नव्यानं भर
जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवरही टीका केली आहे.
जाणून घेऊया काय आहे आजच्या शिवसेनेच्या अग्रलेखात
- उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही.
- उत्तर प्रदेशातील भाजपाचा पाठीराखा असलेला उच्चवर्णीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जात आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपामध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उड्या मारू लागले आहेत हा आहे. पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही.
- राजस्थानात सचिन पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वास निर्वाणीचा इशारा दिला आहे. सचिन पायलट व त्यांचे समर्थक केव्हापासून अस्वस्थ आहेत व त्यांचा एक पाय बाहेर आहेच. सचिन पायलट यांनी वर्षभरापूर्वी बंडच केले होते. ते कसेबसे थंड केले तरी आजही खदखद सुरूच आहे.
- काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे.
- अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.