परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक याचिका हायकोर्टात दाखल

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक याचिका हायकोर्टात दाखल

Parambir Singh: परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) नव्यानं हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) नव्यानं हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या एका विकासकानं ही याचिका दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये परमबीर सिंह यांनी त्यांच्या म्हणजेच विकासकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ नये, यासाठी 200 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

विकासक दिपक निकाळजेसोबत अर्जदार कार्तिक भट यानं चेंबूरमधील एका झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरु केल्याचं सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात 2020 मध्ये एफआयआर दाखल केली होती. FIR प्रमाणे तपास न करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपल्याकडे 200 कोटी रुपयांची लाच मागितली होती. तसंच सदर गृहनिर्माण प्रकल्पाच्या 425 कोटींच्या उत्पन्नातील 10 टक्क्यांचीही मागणी केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.

याव्यतिरिक्त 2018 मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनीही परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन आपल्याकडे खंडणी मागितली होती, असा आरोपही अर्जदार भट यांच्याकडून अर्जात करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासोबत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केल्याचा आरोपही अर्जात केला आहे.

या अर्जावर गुरुवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर वेळेच्या अभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे येत्या 14 जूनला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाकडून दिलासा

परमबीर सिंह यांना आता 15 जूनपर्यंत अटक होणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयात (High Court) दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच् या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात तक्रार केली आहे. परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे.

Published by: Pooja Vichare
First published: June 11, 2021, 7:34 AM IST

ताज्या बातम्या