रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 18 ऑगस्ट : ‘धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडणे धोकादायक आहे’, असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण, प्रवासी नको ते धाडस करून स्वत:चा जीव धोक्यात घालताl. अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर (Gondia railway station) घडली आहे. चुकीच्या रेल्वेमध्ये चढले म्हणून एका तरुणीनं रेल्वेतून उडी मारली. यावेळी ती तरुणी रेल्वेखाली चालली होती, पण वेळीच आरपीएफच्या जवानाने देवाप्रमाणे धाव घेऊन वाचवले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया रेल्वे स्थानकावर 16 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. गोंदिया रेल्वे स्थानकावर नेहमी प्रमाणे समता एक्स्प्रेस आली होती. रात्री ११.५५ मिनाटांनी समता एक्स्प्रेस सुटली. या रेल्वेमध्ये एका तरुणीनं घाईघाईने प्रवेश केला.
पण जेव्हा रेल्वे सुटल्यावर त्या तरुणीला लक्षात आले की, क्रमांक १२८४३ पुरी अहमदाबाद या रेल्वेमध्ये जायचे होते. मात्र आपण चुकीच्या एक्स्प्रेसमध्ये आलो आहोत. ही बाब लक्षात आल्यावर या महिलेनं रेल्वेची गती कमी असल्याचा अंदाज घेऊन चालत्या रेल्वेमधून प्लॅटफॉर्म वर उडी मारली. पण रेल्वेचा वेग हा जास्त होता, उडी मारल्यावर ही तरुणी लगेच खाली पडली. रेल्वेच्या वेगाने ती खेचली गेली आणि तिचे हात आणि डोकं हे रेल्वे आणि प्लॅटफार्मच्या मध्ये जाणार होते. ( धक्कादायक! उसने पैसे मागितले म्हणून जिवंत जाळलं, शिक्षिकेचा मृत्यू ) पण तिथेच उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर आपले कर्तव्य बजावत असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी ते बघताच काही क्षणाच्या विलंबन न करता झडप मारून या तरुणीला वायूच्या वेगाने बाजूला खेचलं. त्यांच्या प्रसंगावधानपणामुळे या तरुणीचा जीव अगदी थोडक्यात वाचला. प्रमोद कुमार यांच्या या धाडसी कार्याबद्दल कौतुक होत आहे.