कोल्हापूर, 14 सप्टेंबर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूरमध्ये येत्या 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजातील नेते सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तर मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा...मोठी बातमी! मराठा संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत, पोलिसांनी बजावली नोटीस
संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा, अशी मागणी मराठा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या गोलमेज परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो, याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये रविवारी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर गडिंग्लज तालुक्यात सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी गोलमेज परिषदेची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरनंतर राज्यातील 181 आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीनं दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांनी मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी यासाठी सर्व खासदारांना राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहिले आहे.
संभाजीराजे आपल्या पत्रात म्हणाले की, 'आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे.'
'न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे.' असं संभाजीराजेंनी या पत्रात म्हटलं आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटिस...
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव नाराज झाले आहेत. त्यामुळे मराठा संघटनांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यात नाशिक पोलिसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. 149 कलमाखाली ही नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा...याला असंवेदनशीलता का नाही म्हणायचं? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्यानं खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा संघटना आणखी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.