वाळूज, 22 जून : विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाईल. तसेच याच दिवशी मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. त्यामुळे यंदा दोन सणांचा अनोखा संगम पाहायला मिळेल. विशेष म्हणजे संभाजीनगरच्या वाळूज भागातील मुस्लीम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र उत्सवाचं वातारण आहे. तर, दुसरीकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.
बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा अवमान होऊ नये यासाठी वाळूजच्या मुस्लीम बांधवांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे बकरी ईद साजरी करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी आहे. या तीन दिवसांमध्ये कधीही हा उत्सव साजरा करता येतो. Toe Rings Design : चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण! पाहा जोडव्यांचे सुंदर आणि ट्रेंडी डिझाईन्स दरम्यान, मुस्लीम बांधवांचा बोकड खरेदीकडे कल वाढला असल्याने बाजारात बोकड विक्रीस दाखल झाले आहेत. परंतु वादळवारा आणि पावसामुळे बोकडांच्या दरावर परिणाम झालेला दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोकडाच्या दरामागे तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे.