रत्नागिरी, 4 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परराज्यातल्या कामगारांच्या आरोग्याची अक्षरशः ऐशीच्या तैशी झालेली पाहायला मिळाली. एका लहानशा खोलीत 25 ते 30 कामगार राहत होते. आणि या कामगारांचे डोळे, कान, नाक, एवढंच नाही तर त्यांची त्वचा आणि केस देखील अक्षरशः निळ्या रंगाने माखलेले पाहायला मिळाले. हे सर्व कामगार लोटे एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमध्ये काम करतात. अनेक कामगारांना त्वचेचे विकार, डोळ्यांचे त्रास देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. 15 ऑगस्ट निमित्त मानवाधिकार संघटनेच्यावतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार होते. त्यासाठी एमआयडीसी परिसरात पाहणीसाठी गेलेल्या मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हे वास्तव निदर्शनास आलं. त्यानंतर एमआयडीसीमध्ये परराज्यातल्या कामगारांना कशाप्रकारे वागवले जाते, त्यांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळले जाते हे समोर आले आहे. ( शिंदे गटात वेगवान हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली 50 आमदारांची महत्त्वाची बैठक ) एमआयडीसी परिसरातच एका लहानशा खोलीत 25 ते 30 कामगारांची ही अवस्था थक्क करणारी आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ, आरोग्य आणि सुरक्षा विभाग नेमकं काय काम करतंय असा प्रश्न निर्माण झालाय. कामगार हे कंपनीचे आत्मा असतात. त्यांना चांगली वागणूक आणि सुविधा दिल्या तर त्याचा फायदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कंपनीलाच होतो. कारण चांगल्या सोयी-सुविधांमुळे कामगार खूश असतात. ती खुल्या मनाने चांगली कामं करतात. कामगार आपल्या कामात वेगवेगळ्या कल्पक युक्तींचा वापर करुन कंपनीला फायदा मिळवून देवू शकतात. या सगळ्या गोष्टी आहेतच, पण माणसाला माणसासारखं वागवणं हा त्या कामगारांता मुलभूत अधिकार आहे. या प्रकरणाची दखल प्रशासनाकडून घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.