रत्नागिरी, 17 सप्टेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. “आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले”, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी पत्रदेखील दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काल रत्निगिरीत दाखल झाली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच आज दुसऱ्या दिवशी रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे. “शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना माहित आहे. कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा शंभर खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षात कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर”, अशी टीका रामदास कदम यांनी केली. “अडीच वर्षात आपण पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणून जवळ आला. पर्यावरण खात्याचे काम समजून घेतले आणि नंतर काकाच्या म्हणजेच माझ्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः पर्यावरण मंत्री बनून माझ्या खुर्चीत बसला”, असा गुन्हा रामदास कदम यांनी केला. ( मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार, विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता ) रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली. काल आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा झाल्यानंतर आज शिंदे गटाचे नेते रामदास कदम खेडमध्ये आले. यावेळ त्यांनी टीका केली. “भास्कर जाधव यांची अवकात काय? भास्कर जाधव हा नाच्या आमदार”, अशी गंभीर टीका रामदास कदम यांनी केली. चिपळूणचे चीनपाट नाच्या आमदार भास्कर जाधव याची अवकात आहे का? आपण त्याचे कधी पाय धरले? आपण केशवराव भोसले यांच्या गादीवर ड्राइव्हर होतो असे बोलतो ते केशवराव भोसले अजून जिवंत आहेत त्यांना विचारा, असं रामदास कदम म्हणाले. “रविवारी म्हणजे उद्या दापोलीत शिंदे गटाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सगळ्यांचा खरपूस समाचार घेणार, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.