कोल्हापूर,09 ऑगस्ट : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्यांची फसवणूक करत आहेत. मोठ्या प्रमाणे उसात काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. (Raju Shetti) त्याची जीएसटी न भरता साखरेची परस्परक विक्री होत असून तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जीएसटी सहआयुक्त वैशाली काशीद जीएसटी उपायुक्त कोल्हापूर यांच्याकडे केली.
याबाबत शेट्टी म्हणाले कि, राज्यामधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस वजन करत असताना सर्रास काटामारी करतात. एकूण वजनाच्या 10 टक्के इतकी काटामारी केली जाते. हे आमच्या निदर्शनास आले आहे. काटामारीमुळे केवळ शेतकर्यांचेच नुकसान होत नसून काटामारीतून उत्पादीत झालेली साखर चोरून विकली जात असल्याने त्यावरील जीएसटी बुडवून शासनाचेही नुकसान होते.
हे ही वाचा : Wheat Rate : मोदी सरकारची डोकेदुखी वाढली, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किंमतीत झपाट्याने वाढ
महाराष्ट्रात गेल्यावर्षी 13 कोटी 20 लाख टन इतक्या उसाचे उत्पादन झाले. त्याच्या 10 टक्के म्हणजे 1 कोटी 32 लाख टन उसाची चोरी झाली, व त्यापासून उत्पादीत झालेली 14.78 लाख टन साखर विना जीएसटी विकली गेली आणि त्यामुळे 229 कोटी रूपयांची जीएसटी बुडवली गेली. कोल्हापूर विभागाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 2 कोटी 55 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून 25 लाख 50 हजार टन ऊस काटामारीतून चोरला गेला.
त्यापासून तयार झालेली 3 लाख 16 हजार टन साखर चोरून विकली गेली यामधून 48.90 कोटी रूपयांचा जीएसटी बुडाला. उसात काटामारी करून राज्यात सरासरी 4581 कोटींचा दरोडा टाकला जात आहे. चोरीच्या साखरेची विक्री बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, किरकोळ व्यापारी यांच्यामार्फत चोरून विक्री केली जाते. यातील थेट पैसा चोरांच्या घशात जात आहे.
हे ही वाचा : शेतकरी भर पावसात उभे होते पण मुख्यमंत्री आलेच नाही, शिंदेंनी लगेच केला फोन आणि...
साखर कारखानदार हे धनदांडगे आणि राजकीय नेते आहेत. म्हणून त्यांनी राजरोसपणाने कर चोरी करावी का ? असा काही कायदा नाही. आपल्या खात्याकडून छोट्या मोठ्या व्यापार्यांच्यावर सर्रास धाडी टाकून कारवाई केली जाते. मग हे धनदांडगे मोकाट का? यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर अचानक धाडी टाकून त्यांचे हिशेब तपासावेत. जर या चोर्या थांबल्या तर आपल्या विभागाचा महसूल वाढेल आणि शेतकर्यांची लूट थांबेल. या संदर्भातील सर्व माहिती द्यायला शेतकरी पुढे येतील,त्यासाठी आपण कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: GST, Kolhapur, Raju Shetti, Raju Shetti (Politician), Swabhimani Shetkari Sanghatana