मुंबई, 24 सप्टेंबर : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हायकोर्टाने परवानगी दिल्यामुळे शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्याच्या राजकारणामध्ये पडू नये, असा सल्ला दिला होता, असा गौप्यस्फोट मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने आटोकात प्रयत्न केला होता. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला हायकोर्टात आव्हानही दिले होते. पण, हायकोर्टाने शिवसेनेला परवानगी देऊन शिंदे गटाला दणका दिला. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना या वादावर मोठा खुलासा केला आहे. (‘अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त नावालाच होते, खरे मुख्यमंत्री तर…’; तानाजी सावंतांनी पुन्हा साधला निशाणा) दसरा मेळावा घ्यावा असं मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. मी ही गोष्ट राज ठाकरे यांच्या कानी टाकली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी स्पष्टपणे नकार दिला होता. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे घट्ट समीकरण आहे. यामध्ये आपण पडू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी शिंदेंना दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये असा सल्लाही दिला होता. कदाचित या गोष्टी टाळत्या आल्या असत्या तर आज बरं झालं असतं, असा खुलासा महाजन यांनी केला. (देवेंद्र फडणवीस तब्बल सहा जिल्ह्यांचे प्रमुख, पालकमंत्र्यांच्या यादीत भाजपचाच वरचष्मा) ‘राज ठाकरे यांचा राजकारण हे कोत्या मनाचं नाही, उमेद्या मनाचं राजकारण आहे. राजकारण करावे, मतभेद नक्की असतील पण एखाद्याची परंपरा वर्षांनुवर्ष सुरू असेल, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. अशा ठिकाणी आपण राजकारण आणू नये, असं राज ठाकरे यांचं म्हणणं होतं, असंही महाजन म्हणाले. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हा वेगळा पक्ष आहे. आपण गुढीपाडव्याला मेळावा घेत असतो. दसरा मेळाव्याशी आपला संबंध येत नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या राजकारण पडण्यास ,स्पष्ट नकार दिला होता, असंही महाजन म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.