नांदेड, 1 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे, पण या यात्रेवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. महाराष्ट्राच्या फक्त 5 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे, त्यामुळे यात्रेच्या नियोजनावर टीका होत आहे. काँग्रेसमध्येही यात्रेच्या नियोजनावरून दोन गट पाहायला मिळत आहेत. भारत जोडो यात्रेचा रूट कसा ठरवला, हे माहिती नाही. तो त्यांचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. कन्याकुमारी आणि श्रीनगर असं गुगलमध्ये टाकलं असेल आणि शॉर्टेस्ट रूट कसा आहे, तो काढला असेल, मला ते माहिती नाही. मी ही तो रूट टाकून बघितला, पण तो वेगळ्या दिशेने जातो, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेचा मार्ग पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण ठरवत नाहीत. यात हे चव्हाण ते चव्हाण नाही. यात्रेचा मार्ग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवला आहे. त्यांना जो मार्ग सोयीचा वाटला त्यांनी तसा ठरवला, असं अशोक चव्हाण म्हणाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मार्ग केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन होणार आहे, पण या यात्रेत केवळ 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.