पुणे, 12 नोव्हेंबर : पुण्यात सध्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. कबड्डीला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या या स्पर्धेचा सध्या 9 वा सिझन सुरू आहे. एकूण 12 टीम ही स्पर्धा जिंकण्यासाठी मॅटवर घाम गाळतायत. प्रत्येक टीमचे आत्तापर्यंत 10 पेक्षा जास्त सामने झाले असून त्यामध्ये यजमान पुणेरी पलटणची टीम 44 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
कबड्डीच्या मॅटवर रोज संध्याकाळी थरारक सामने होत आहेत. या स्पर्धेचं वेळापत्रक पाहिलं तर प्रत्येक टीमला एकापाठोपाठ एक सामने खेळायचे आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकात एखाद्या टीमला दिवसभर सुट्टी असेल तर ती टीम साहजिकच पुणे दर्शनासाठी बाहेर पडेल. गुजरात जायंट्स टीमनंही काही दिवसांपूर्वी हेच केलं. त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि ऐतिहासिक शनिवारवाडाही पाहिला. या दोन कार्यक्रमानंतर त्यांची टीम पोटपुजेसाठी पुण्यातील प्रसिद्ध काटा किर्रर्र मिसळ खाण्यासाठी दाखल झाली.
PKL 2022 : फजल अत्राचली कसं करणार पुणेरी पलटणचं स्वप्न पूर्ण? पाहा Video
मिसल नही मिसाईल!
गुजरात टीममधला उज्ज्वल सिंह पहिल्यांदाच पुण्यात आला होता. त्याला ही मिसळ चांगलीच आवडली. ही तर ही मिसळ आपण हा.. हू.. करत खाल्ली असं बलदेव सिंहनं सांगितलं. 'ही मिसळ नाही तर मिसाईल' आहे, अशीच त्याची भावना झाली होती. आपण पहिल्यांदाच ही मिसळ खाल्ली, ही अतिशय तिखट पण चविष्ट मिसळ असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रतिक दहिया याने तर मिसळ हा प्रकार आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला. आपल्याला आणि सर्व सहकाऱ्यांना मिसळ खूप आवडल्याचं त्यानं सांगितलं. तर, 'मी पुण्यात पुन्हा कधी आलो तर मला पुन्हा ही मिसळ खायला आवडेल. त्याबरोबरच मला वडापाव देखील खायचा आहे, असे प्रदिप कुमार म्हणाला.
गुजरात कितव्या नंबरवर?
प्रो कबड्डी लीगमध्ये आत्तापर्यंत (11 नोव्हेंबर) गुजरात जायंट्सनं 11 सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी 5 विजय आणि 5 पराभव पत्कारले आहेत. तर एक सामना अनिर्नित सुटलाय. 31 पॉईंट्ससह गुजरातची टीम सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी या टीमला उर्वरित सामन्यात जोरदार खेळ करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 food, Pro kabaddi league, Pune, Sports