पुणे, 23 सप्टेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघाची जबाबदारी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविली आहे. या निमित्ताने पक्ष संघटनासाठी बारामतीमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. काय म्हणाल्या निर्मला सीतारामन - माझा दौरा हा केवळ पक्ष संघटनेसाठी असताना एवढी गरमाहट का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. माझ्या दौऱ्यावरील टीका टिप्पणी केल्यामुळे मी आश्चर्यचकित झाले. मी तुमच्या पाठिशी ठामपणे उभी राहिल, तसेच फक्त निवडणुकांसाठी नाहीतर बारामतीकरांच्या सेवेत सदैव तत्पर राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. बारामती विकासाच्या एवढाच बोलबाला असेल तर मग आमचे पक्ष पदाधिकारी विकासातील ही विषमता कशी काय समोर आणताहेत, असा सवालही त्यांनी विचारला. याचाच अर्थ विकासाचा समतोल राखलेला नाही. विरोधकांवर अन्याय उघडउघड दिसतोय, असे म्हणत त्यांनी सांगितले की, मी बारामतीत सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान मोदींचा मंत्र रूजवू पाहते आहे. त्यासाठी बारामतीत राबवल्या जाणाऱ्या केंद्रीय योजनांचा मी स्वत: यापुढे आढावा घेत राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याच दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान त्यांनी, क्या आप मेरा हिंदी समझ रहे, असे विचारत सितारामन यांनी लोकांना हात उंचावून त्यांना होकार मिळवला.
दरम्यान, यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव असलेल्या भागात विकास रोखला जातो आहे. याचा मी धिक्कार करते आहे. या बारामतीत फक्त एकाच परिवाराचा विकास होतो आहे, इथे छप्पर फाडके फक्त एका परिवारालाच मिळते आहे. म्हणूनच भाजप राजकीय घराणेशाहीविरोधात आहे, या शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. हेही वाचा - लोकसभेसाठी भाजपचं मिशन 45! सेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री रिंगणात, बारामतीही लक्ष्य भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत. देशभरात मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिकडे दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी आहे.