पुणे, 5 ऑगस्ट : बहुचर्चित टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सुशील खोडवेकर हे 2011 च्या IAS बँचचे अधिकारी आहेत. टीईटी घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच खोडवेकरांना शासनानं पुन्हा सेवेत रूज करून घेतलं आहे.
टीईटी प्रकरणामध्ये अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सुशील खोडवेकर हे 2011 अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. पूर्वी शिक्षण विभागात आस्थापनांमध्ये उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांनी तुकाराम सुपे यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये निर्दोष सोडले होते आणि जीए सॉफ्टवेअर या कंपनीस काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली होती. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली होती. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education department, Pune