पुणे, 9 नोव्हेंबर : पुण्यात आल्यावर मिसळ खाल्ली नाही असं सहसा होत नाही. पुणे शहरात आवर्जून मिसळ खावी अशी अनेक ठिकाणं आहेत. काटा किर्रर्र हे यामधील प्रमुख नाव आहे. पुण्यात सध्या प्रो कबड्डी लीगचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेच्या भरगच्च वेळापत्रकातही काटा किर्रर्रची मिसळ खाण्याचा मोह गुजरात जायन्ट्सच्या खेळाडूंना झाला. या खेळाडूंनी मिसळीवर ताव मारत असतानाच न्यूज 18 नेटवर्कच्या प्रतिनिधीशी बोलताना या खेळाडूंनी त्यांचे अनुभव शेअर केले. पुणे दर्शनमध्ये काय केलं? गुजरातचे कोच एम. व्ही. सुंदरम हे देखील टीमसोबत उपस्थित होते. ‘टीममधील खेळाडूंना पुणे शहर पाहाता यावे हा आमचा हेतू होता. आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. ऐतिहासिक शनिवार वाडा खेळाडूंना दाखवला. या दोन ठिकाणानंतर आम्ही कर्वे रोडला शहरातील प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी आलो, असे सुंदरम यांनी सांगितलं. मिसळ खाल्ल्यानंतर बदलला मूड गुजरातच्या टीममधील महेंद्र राजपूत, शंकर, रिंकू नरवाल, प्रदीप कुमार, अक्रम, प्रशांत कुमार राय हे प्रमुख खेळाडू मिसळ खाण्यासाठी आले होते. शहरातील ही फेमस मिसळ खाल्ल्यानंतर आमचा मुड रिफ्रेश झाला आहे. आता आम्ही नव्या उत्साहानं खेळण्यासाठी उतरू अशी भावना टीमच्या कोचनी व्यक्त केली.
गुजरात जायंट्सचा प्रदीप कुमार हा पहिल्यांदाच पुण्यात आला होता. तसंच त्यानं यावेळी पहिल्यांदाच मिसळ खाल्ली. ही मिसळ चांगलीच तिखट आहे. पुण्यात पुन्हा कधीही आल्यानंतर मला ही मिसळ खायला आवडेल, असं प्रदीपनं सांगितलं. टीमचा व्हाईस कॅप्टन रिंकू नरवाल दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भारावून गेला होता. ‘या दर्शनानंतर मन:शांती मिळते. आम्हाला नव्या जिद्दीनं खेळण्याची प्रेरणा मिळाली आहे,’ अशी भावना त्यानं व्यक्त केली. PKL 2022 : फजल अत्राचाली कसं करणार पुणेरी पलटणचं स्वप्न पूर्ण, पाहा Video महेंद्र राजपूत हा महाराष्ट्रीयन खेळाडू देखील गुजरातच्या टीममध्ये आहे. महेंद्र देखील मिसळ खाल्ल्यानंतर चांगलाच फ्रेश झाला होता. ‘कबड्डीमुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. आपल्याच मातीत इतर प्रांतामधील मित्रांसोबत आपल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते,’ असे महेंद्र यावेळी म्हणाला. आज आमचा चीट डे होता. या दिवशी आम्हाला एकदम भारी ट्रिट मिळाली. यामुळे आम्ही नव्या जोमानं खेळायला सुरूवात करू. आम्हाला सर्वांनाच पुन्हा एकदा पुणे शहर पाहायचे आहे, असे गुजरात टीममधील प्रमुख खेळाडू शंकर आणि अक्रम यांनी सांगितले.