पुणे, 24 ऑगस्ट : नेमीची येतो मग पावसाळा… हे एक शाश्वत सत्य आहे. त्याचबरोबर पाऊस पडला की पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे आणखी मोठे होतात. त्या खड्ड्यावरून गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या जाहिरनाम्यात, राजकीय भाषणांमध्ये खड्डेमुक्त रस्त्याचं आश्वासन देतात. ही सर्व आश्वासनं पहिल्याच पावसात फोल ठरत असल्याचं आपण दरवर्षी अनुभवलं आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत सारखीच परिस्थिती आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न वारंवार विचारला जात असताना पुण्यातील एका रस्त्यावर गेल्या 46 वर्षांपासून एकही खड्डा पडलेला नाही. हे शक्य आहे! हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही स्वत: पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाहा. जंगली महाराज मठ ते डेक्कनपर्यंत असलेल्या या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. 1976 साली हा रस्ता पुणेकरांसाठी वाहतूकीसाठी खुला झाला. पुण्यातील एक वर्दळीचा रस्ता अशी त्याची ओळख आहे. त्यानंतरही गेल्या 46 वर्षांमध्ये या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. तसंच हा रस्ता कधीही खोदावा लागलेला नाही. पुणे महानगरपालिकेचे 1973 साली स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या श्रीकांत शिरोळे यांनी या रस्त्याची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सांगितला आहे. ‘1976 पूर्वी हा रस्ता संपूर्ण चिखलाचा होता. त्यावेळी देखील आजच्याप्रमाणे रस्ते खराब होण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यावेळी आम्ही मुंबईच्या रिकांडो कंपनीचे काम पाहिले. त्यानंतर जंगली महाराज ते डेक्कन पर्यंतचे काम करण्याचे काम आम्ही त्या कंपनीला दिले. या कामासाठी कोणतेही टेंडर निघाले नव्हते. आम्ही एकूण 15 लाख रुपयांमध्ये ते कंत्राट कंपनीला दिलं होतं. Pune: आले अपंगत्व तरी हरली नाही जिद्द! बाप्पाच्या आशीर्वादानं उभा केला संसार, VIDEO रस्ता निर्मितीसाठी अटी जंगली महाराज रस्ता बनवण्याचं काम मिळाल्यानंतर रिकांडो कंपनीनं काही अटी घातल्या. ड्रेनेज, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, पाईपलाईन या सारख्या वेगवेगळ्या कामासाठी रस्ता खोदला जातो. तसा प्रकार होऊ नये म्हणून कंपनीनं रस्ता बांधतानाच या सर्व गोष्टींची व्यवस्था केली. त्याचबरोबर रस्ता दुरुस्तीसाठी काही अटी घातल्या. पुणे महापालिकेनं या रस्त्यावर एकही खिळा ठोकू नये अशी कंपनीची मुख्य अट होती. त्याचबरोबर या रस्त्यावर मांडव उभारणीसाठी खड्डे खोदण्यासही मनाई करावी, अशी अट कंपनीनं घातली होती. त्यानंतरच रिकांडो कंपनी काम करण्यास तयार झाली. रस्ता तयार झाल्यानंतर दहा वर्षांमध्ये काहीही झाल्यास रस्त्याची दुरुस्ती कंपनी करेल असंही महापालिका सोबतच्या करारामध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र गेल्या 46 वर्षांमध्ये रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही. त्यामुळे याची गरज कधी भासलीच नाही,’ असे शितोळे यांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात घ्या केदारनाथचा अनुभव, अंजनेरी पर्वतरांगेत साकारलंय हुबेहुब मंदिर, पाहा VIDEO भ्रष्टाचारमुक्त रस्ता! हा रस्ता त्यांच्या उत्कृष्ट कामाचं उदाहरण आहेच त्याचबरोबर हा बांधणाऱ्या कंपनीला आम्ही देणाऱ्या पैशामधील एकही पैसा कुणाला द्यायचा नाही, अशी अट महापालिकेनं घातली होती. हा रस्ता म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या काळामध्ये या रस्त्यावर आम्ही विशेष देखरेख केली होती. या रस्त्याच्या कामामध्ये कुठल्याही पद्धती हयगय होऊ नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती. तसंच कंपनीचं काम देखील अतिशय उत्कृष्ट होते,’ अशी आठवण शितोळे यांनी सांगितली. पुन्हा असा रस्ता का झाला नाही? या रस्त्याची दहा वर्षांची मुदत पूर्ण झाली तेव्हा पुण्यात सत्ता बदलली होती. पुणे महापालिकेचे अधिकारी बदलले होते. तसंच रिकांडो कंपनी ज्या दोन भावांची होती त्यांनीही आपल्या वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्यामुळे या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट निघाले नाही. पुणे महापालिकेनं येरवडा आणि औंधमध्ये रस्ते बांधण्यासाठी स्थानिक ठेकेदारांना कंत्राट दिले. पण जंगली महाराज रस्त्याच्या कामाची सर त्याला आली नाही. त्यामुळे पुण्यात असा रस्ता पुन्हा झाला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







