पुणे, 6 सप्टेंबर : पुणे शहरात सध्या गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्यातील अनेक भागात भाविकांनी आपल्या घरगुती लाडक्या गणपती बाप्पासाठी विविध देखाव्यांचे प्रदर्शन केले आहे. यामध्ये सध्या एका घरगुती गणपतीचा देखावा पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी सम्राट रावते यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाच्या घरगुती देखाव्यातून मेट्रो कॉरिडॉर 2 प्रतिकृती साकारली आहे. सम्राट रावते आणि मित्र परिवार यांनी मिळून हा देखावा तयार केला आहे. या देखाव्यात आपल्याला ‘पुण्याच्या मेट्रो’ चे दर्शन होते. पुणे मेट्रो प्रकल्प कॉरिडॉर-2, वनाझ ते रामवाडी अंतर्गत बंडगार्डन - येरवडा - कल्याणीनगर मेट्रो ट्रॅक आणि मेट्रो स्टेशन याची काल्पनिक स्वरूपात उभारणी त्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये मेट्रोचे काम जोरदार सुरू आहे. व काही भागांमध्ये मेट्रो सुरु देखील झाली आहे. पुण्यात मेट्रोचे जाळे काही दिवसात अजून विस्तारणार असून ते या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा : Ganeshotsav 2022 : नाशिकमध्ये साकारला पुस्तकांचा बाप्पा, पाहा कशी सुचली अनोखी कल्पना VIDEO यासाठी त्यांनी तब्बल 22 दिवस तयारी केली त्याचबरोबर या देखाव्यात त्यांनी 11 फूट लांब मेट्रो ट्रॅक, 3 मेट्रो स्टेशन, 3 मेट्रो ट्रेन, 32 मेट्रो ब्रिज खांब, मुळा - मुठा नदी, सायकल ट्रॅक ,फूट फुटपाथ, ब्रिटीश कालीन पूल, नवा आणि जुना बंडगार्डन पूल यांची उभारणी केली आहे. याबाबत सम्राट रावते सांगतात की, पुण्यामध्ये गेल्या काही वर्षापासून मेट्रोचे काम सुरू आहे. यामधील सर्व कर्मचारी अधिकार वर्गाला समर्पित अशी मेट्रोची प्रतिकृती मी आणि माझ्या मित्रमंडळींनी तयार केली आहे. या मेट्रोच्या प्रतिकृतीद्वारे मेट्रो पुण्यात सुरू झाल्यानंतर कशा प्रकारचे पुणे असेल हे आम्ही दाखवले आहे. तब्बल 22 दिवस मला हा देखावा बनवण्यासाठी लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.