पुणे, 14 ऑक्टोबर : बदलत्या काळातील शहराची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स सुरू झाली. हॉटेलनंतर कॅफे हा देखील महानगरांचा अविभाज्य भाग बनली आहेत. आवडते ब्रेव्हरेज, शांतता आणि कामासाठी, मित्रांसोबत वेळ घालवायला निवांत जागा या वैशिष्ट्यांमुळे कॅफे तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तरुणांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात देशातील पहिला टाईम कॅफे सुरू झाला आहे. या कॅफेमध्ये तेथील पदार्थांना नाही तर वेळेची किंमत मोजावी लागते.
काय आहे नवीन ?
पुण्यातील भोसले नगरमध्ये साडेपाच हजार स्केवअर फुट प्रशस्त जागेत टाईम कॅफे या संकल्पनेवर आधारित मौजी कॅफे पुण्यात सुरू करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक तासासाठी दीडशे रूपये मोजून हा कॅफे वापरु शकता. या तासाभरात तुम्हाला वेगवेगळ्या कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, हॉट चॉकलेट ही ब्रेव्हरेज मिळू शकतील. त्याचबरोबर तुम्हाला स्वत: हवं तसं ब्रेड जाम बटर खायचं असेल तर ही सोय देखील या कॅफेमध्ये आहे.
अनेकदा कामासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींना जेवणाचा डबा कुठं खायचा हा प्रश्न असतो. या कॅफेमध्ये येऊन तुम्ही जेवणाचा डबा देखील खाऊ शकता. या कॅफेत ग्रंथालय देखील आहे. या ग्रंथालयात तुम्हाला पुस्तकं देखील वाचता येतात. गरम कॉफी सोबत पुस्तकं वाचण्याची सोय देखील या कॅफेत करण्यात आली आहे.
पुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल! पाहा Video
पुण्यात आता ऑफिस स्पेस ही संकल्पना वेगानं विकसित होत आहे. या कॅफेचा काही भाग ऑफिससाठी भाड्याने दिला जातो. त्या ठिकाणी तुमचे ऑफिसच्या मीटिंग्ज, रोजचे काम, प्रेझेंटेशनची तयारी हे सर्व करण्याची सोय आहे. या ऑफिसमधील सर्व वस्तू कलात्मक पद्धतीनं सजवलेल्या आहेत. त्यामुळे ऑफिसच्या टिपिकल वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात काम करण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तसंच या कामातून ब्रेक म्हणून येथील ब्रेव्हरेजचा आनंद घेण्याची सोय देखील तुम्हाला आहे.
गुगल मॅपवरून साभार
'टाईम कॅफे ही एक रशियन संकल्पना आहे. रशियात या पद्धतीचे अनेक कॅफे आहेत. त्यामध्ये ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या वेळेनुसार जागा दिली जाते. ऑफिस, वेगवेगळे समारंभ, मित्र-मैत्रिणींच्या सोबत वेळ घालवणे करणे या सर्व गोष्टींसाठी ही उपयोगी जागा आहे. इथे आम्ही ग्राहकांच्या वेळेची किंमत घेतो. देशातील हा पहिलाच टाईम कॅफे आहे,' अशी माहिती या कॅफेच्या मालक ब्रिंदा पुरोहित यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital prime time, Pune