पुणे, 30 मे : जेजुरी गडावरची यात्रा (Jejuri Yatra) म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गडावर गर्दी करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातूनही भाविक येतात. याच जेजुरी गडावर सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह -
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे. या निमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष यात्रा बंद होती. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले. यानंतर दोन वर्षांनी ही यात्रा भरली आहे. यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळी 11 वाजता गडावरून पालखीही कऱ्हा स्नानासाठी निघणार आहे. तसेच सायंकाळी 4 वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात येणार आहे.
सोमवती अमावास्येनिमित्त खंडेरायाच्या दर्शनाला गड जेजुरीवर अलोट गर्दी झाली आहे. 11 वाजता पालखी कऱ्हा स्नानाला निघणार आहे. #Amavasyapic.twitter.com/TPb40AdrQy
भाविकांनी केली होती प्रार्थना -
कोरोनाकाळात गडाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. तसंच, यावर्षीची चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द झाली आहे. त्यामुळे भक्तांना त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेता आले नाही. जगावरच कोरोनाचं संकट दूर होऊन, सगळेजण सुखी होवोत, अशी प्रार्थना भाविकांकडून करण्यात आली होती. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे सरकारने सर्व प्रकारची निर्बंध हटवली. यामुळे जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
हेही वाचा - पंढरपुरच्या वारीबाबत पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं वक्तव्य; 'मन की बात'मध्ये म्हणाले...
जेजुरी गडावर साजरा होणाऱ्या बहुरंगी-बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते. मात्र, कोरोनाकाळात शासनाकडून सार्वजनिक सणासुदीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणूनच जेजुरी गडावर हा शुकशुकाट होता. आता निर्बंध हटल्याने सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.