पुणे, 2 सप्टेंबर : जगविख्यात अशा पुणे फेस्टिवलमध्ये तब्बल 8 वर्षांनंतर सुरेश कलमाडी पुढाकार घेताना दिसत आहेत. पण यावेळचा सर्वात मोठा फरक म्हणजे पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर काँग्रेसऐवजी चक्क भाजपचे नेते चमकताना दिसू लागलेत, त्यामुळे यावर्षीचा पुणे फेस्टिवल भाजपने हायजँक केला नाही ना असा आरोप होऊ लागला आहे. आता पुणे फेस्टिवलही भाजपने हायजॅक केलाय? पुणे फेस्टिवलचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी पुन्हा सक्रीय झाल्याने यंदाचा पुणे फेस्टिवल अगदी दिमाखात साजरा होत आहे. पण या फेस्टिवलच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच काँग्रेस ऐवजी भाजपचे नेते झळकताना दिसत आहेत. कलमाडी काँग्रेसचे नेते असूनही त्यांच्याच पक्षाच्या एकाही मोठ्या नेत्याला निमंत्रण नाही. याबद्दल पुण्याच्या राजकीय वर्तुळात फक्त आश्चर्यच व्यक्त होत नाही तर भाजपने हा महोत्सव हायजॅक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. काँग्रेसचे नाना पटोलेही काहीसे असच सुचवू पाहत आहेत. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही याकडे फक्त फेस्टिवल म्हणून बघतो. असा दावा ते करतात. पुण्याचे दोन भाग होणार? चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीसांचं स्पष्टीकरण! कॉमनवेल्थ घोटाऴ्यात कलमाडी यांना अटक झाली होती. तेव्हापासून काँग्रेसने कलमाडींना काहीसं दुर्लक्षित केल्याचं चित्र होतं. आताही काँग्रेसचे हायकमांड कलमाडींना फारसं जवळ करताना दिसत नाहीत. कदाचित म्हणूनच कलमाडी पुणे फेस्टिवलच्या आयोजनाच्या निमित्ताने का होईना भाजपच्या जवळ जाताना दिसू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होतं हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.