पुणे 12 ऑक्टोबर : प्रवासी बसला अचानक आग लागल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. अनेकदा यात काही प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागतो. नाशिकमध्ये प्रवासी बसला आग लागून 10 ते 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून बसला अचानक आग लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
कल्याणवरून भीमाशंकरला जाणारी ही प्रवासी बस अचानक पेटली. मंचर-भीमाशंकर रोडवरील घोडेगावजवळच्या शिंदेवाडी इथे ही घटना घडली. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व 29 प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.
कल्याणवरून भीमाशंकरला जाणारी प्रवासी बस अचानक पेटली. मंचर-भीमाशंकर रोडवरील घोडेगावजवळच्या शिंदेवाडी इथे ही घटना घडली. बसमधील सर्व 29 प्रवासी सुखरूप आहेत. pic.twitter.com/Tm8c3c5c7N
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2022
घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बस आग लागल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आल्याचं दिसतं. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आसपासचे नागरिक याठिकाणी पोहोचले. नागरिकांनी बसवर पाणी ओतून ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत.
Video: आईचा हात धरून रस्त्यावरुन चाललेला अरद; मागून दुचाकी आली अन्..., वाढदिवशीच घडलं भयानक
नाशिकमध्ये घडलेली मोठी दुर्घटना -
नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी एक भीषण घटना घडली होती. यात पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. यामध्ये 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. प्रवासी बस ट्रकच्या डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागल्याचं सांगितलं गेलं होतं. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Private bus, Pune fire