शिरुर, 01 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजपमध्ये स्पर्धाच सुरू आहे का अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे. पण, त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्याऐवजी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठराखण केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिरुरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना केसरकर यांनी लोढा यांची पाठराखण केली. (Amol Mitkari : बुवाबाजीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री अस्वस्थ, राष्ट्रवादीचा शिंदे गटावर हल्लाबोल) ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटकेचा दाखला देत मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेशी छत्रपतींची तुलना केली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्णय घेण्याची क्षमता पहाता लोढा बोलले असावे, असं म्हणत छत्रपतीचा आदर्श आम्ही पुढे घेऊन जात आहे असे सुचवायचे असावे. त्यामुळे या वक्तव्यातून गैरअर्थ काढला जाऊ नये, असं दीपक केसरकर म्हणाले. काय म्हणाले होते लोढा? लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली आहे. ज्याप्रमाणे शिवराय आग्र्याहून सुटले तसेच शिंदे हे बाहेर पडल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंनी लोढांना फटकारलं दरम्यान, उदयनराजे यांनी लोढा यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. ‘शिवरायांना कोणी पकडून नेले नव्हते, तर त्यांचा विश्वाघात झाला होता. कोणी यांना विरोध करत नाही त्यामुळे हे असे वक्तव्य करतात’ असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. (माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर.., उदयनराजे संतापून स्पष्टच बोलले) तसंच, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर स्वस्थ बसणार नाही. माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी पक्षीय कारवाईला देखील घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये. 3 तारखेनंतर राज्यपालांच्या विरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढवणार असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.