पुणे, 16 मार्च : जगभरात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. भारतातील अनेक राज्यांंमध्ये खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी मॉल्स, चित्रपटगृह आदी बंद ठेवण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune) पब (Pub) आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा (live orchestra) येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील सुध्दा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि पब 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. संबंधित - VIDEO : आयडियाची कल्पना, या व्यक्तीने लढवली कोरोनाला दूर ठेवण्याची नवी शक्कल पुण्यात तरुणांची संख्या जास्त असल्याने येथे पबमध्ये जाणारा मोठा वर्ग आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पबबरोबरच लाईव्ह ऑर्केस्ट्रा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 15 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित केली आहे. पुण्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या कालावधीत पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये सोने, चांदी,कपडे अशा दुकानांचा समावेश असणार आहे. पुणे व्यापारी महासंघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित - आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी! पुण्यात काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अफवांचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसपेक्षा अफवांमुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातून नागरिकांच्या हातून कायद्यांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कुणालाही पॅनिक करू नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.