पिंपरी चिंचवड, 9 ऑक्टोबर: आई-वडिलांचं पटत नव्हतं म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला कापडी पिशवीत गुंडाळून एका चर्चजवळ ठेऊन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते मूल माझं नाही, असं म्हणत पती वारंवार वाद घालत होता. माझ्यासोबत राहायचं असेल तर मुलाला सोडून दे असंही पतीनं पत्नीला बजावलं होतं. दाम्पत्यानं आपलं दोन महिन्यांच्या चिमुरड्याला कापडी पिशवीत गुंडाळून खडकी येथील एका चर्चजवळ ठेवलं आणि पोबारा केला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पिशवीत बाळ आढळून आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. हेही वाचा… एक राजा बिनडोक तर दुसरा.., प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे-संभाजीराजेंवर जहरी टीका मिळालेली माहिती अशी की, खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या दोन महिन्यांच्या बाळाच्या आई-वडिलांचा पोलिसांना शोध लावला आहे. विशेष म्हणजे हे दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. पती हे बाळ आपलं नसल्याचं म्हणत पत्नीशी वाद घालत होता. दोघांच्या या वादातून बाळ रस्तावर सोडून देण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर बाळ पावलं असून त्याचं खोटं सर्टिफिकेट देखील या दाम्पत्यानं मिळवलं होतं. सध्या संबंधित बाळ ससून रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकी पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सअॅपला डीपीवर फोटो पाहाताच… दरम्यान, खडकी पोलिसांनी दोन महिन्यांचा या बाळाचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी ठेवला होता. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरही पोलिसांनी हा फोटो शेअर केला होता. व्हायरल झालेला बाळाचा फोटो त्याच्या मामाच्या व्हॉट्सअॅपवर पोहोचला. मामानं आपल्या बहिणीला बाळाविषयी विचारणा केली. मात्र, काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं तिनं सांगितलं. मामाचा विश्वास बसेना. त्यानं थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना याबाबत माहिती दिली. हेही वाचा… मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक पोलिसांनी बाळाचे आई-वडील आणि मामासह ससून रुग्णालय गाठत त्यांना बाळ दाखवलं. परंतु येथेही आई-वडील हे बाळ आपलंच आहे हे मान्य करायला तयार नव्हते. यावेळी पोलिसांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात विसंगती जाणवली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दाम्पत्यानं गुन्हा कबूल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.