पृथ्वीराज चव्हाणांकडे मोठी जबाबदारी? काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता

पृथ्वीराज चव्हाणांकडे मोठी जबाबदारी? काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची आधी मंत्रिपदासाठी चर्चा होती.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची आधी मंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र आता काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना कोणतं खातं द्यायचं, असा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राने केलेली सुरुवात देशभर जाणार, झारखंडवरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील नाही!

काँग्रेसकडून अद्याप हिरवा कंदील येत नाही म्हणून उद्या शपथविधी करायचा की नाही याची प्रतीक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष करत आहेत. राष्ट्रवादीतील नेते शपथविधी उद्या घ्यावा यासाठी आग्रही आहेत. पण सेनेकडून काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. पुढील काही वेळात याबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी कुणाला मिळणार संधी?

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या