मुंबई, 26 ऑगस्ट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेवून भाजपला मतदान केल्याचं धक्कादायक विधान चव्हाण यांनी केलं आहे. याबाबतचं वृत्त ‘लोकमत’ने दिलं आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचं स्पष्ट विधान केलेलं नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी आर्थिक व्यवहार झाले आहेत, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात भरपूर काहीतरी भयानक घडतंय हे मात्र निश्चित आहे. “या प्रकरणी मी कारवाईची मागणी केली होती. चंद्रकांत हांडोरे या आमच्या सहकाऱ्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे त्यांच्यावर कारवाई करायला हवी. अशी देखील शंका आहे की, यामधे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे समिती नेमण्यात आली. अहवाल देखील समितीने पक्षाच्या नेतृत्वाला पाठवला आहे. आम्ही देखील काय करवाई होतेय याची वाट पाहत आहोत”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘न्यूज 18 लोकमत’सोबत बोलताना सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आझाद यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका करत घरचा आहेर दाखवला. ( काँग्रेसवर कोणाची वैयक्तिक मालकी नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षालाच घरचा आहेर ) “गुलाम नबी आझाद यांचं पत्र वाचलं. पत्रात ज्या बाबी नमूद केल्या आहेत त्याच बाबी आम्ही 2 वर्षांपूर्वी एका गोपनीय पत्रात नमूद केल्या होत्या. त्यावेळी आम्ही लिहिलं होतं की, काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा. काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडून आलेले सदस्य असावेत, अशी आमची मागणी होती. ज्या उद्देशाने पत्र लिहिलं होतं त्यावेळी आमचा संवाद थेट सोनिया गांधी यांच्याशी होता. मात्र त्यावेळी कोणीतरी पत्र फोडलं. आम्हाला जर या बाबी सार्वजनिक करायच्या असत्या तर आम्ही नक्कीच पत्रकार परिषद घेतली असती”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. “त्यानंतर चिंतन शिबिर घेणे गरजेचं असताना नव चेतना शिबिर घेण्यात आलं. त्यावेळी पक्षाला चिंतन करायची गरज नाही, असं नमूद करण्यात आलं होतं. पक्षात 24 वर्षात कोणतीच निवडणुक न झाल्यामुळे कोणतेच सामुदायिक निर्णय घेण्यात आले नाहीत. घटनेवर आधारित काँग्रेसमध्ये निवडणुका घ्या. कटपुतली सारखा अध्यक्ष नको”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे मांडली. “विशेष म्हणजे सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे. देश सध्या हुकूमशाहीच्या दिशेने असताना सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही अपेक्षा शिल्लक नसताना काँग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काँग्रेसला प्रभावी विरोधी म्हणून पूढे येणं गरजेचं आहे. हुकूमशाहीला आम्ही पर्याय देऊ शकलो नाही तर नक्कीच आम्ही देखील त्याला जबाबदार असणार आहोत”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.