कन्हैया खंडेलवाल(प्रतिनिधी),
हिंगोली, 28 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका ओल्या बाळंतीणीस शासकीय महिला रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं. तिचे साहित्य देखील रस्त्यावर फेकण्यात आलं आहे. 'न्यूज 18 लोकमत'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे.
हेही वाचा...वीज बिलांवरून मनसे गप्प राहील, असं समजू नका; राज यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
काय आहे प्रकरण?
सिझेरीयन करुन प्रसुत झालेल्या 19 वर्षीय ओल्या बाळंतीणीस चक्क रुग्णालयातून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात सोमवारी दुपारी घडला होता. वसमत शहरातील महिला 22 जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय स्री रुग्णालयात दाखल झाली होती. सिझेरीयन करीत प्रसुतीनंतर तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. मात्र, अचानक 27 जुलै रोजी सोमवारी सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालयात धडकले. यानंतर पाच दिवसांच्या ओल्या बाळंतीणीला चक्क एका ऑटोमध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालयात काढून दिल्याचा आरोप काही युवकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला.
या प्रकरणी 'न्यूज 18 लोकमत'ने याप्रकरणी सगळ्यात आधी बातमी प्रसिद्ध केली होती. 'न्यूज 18 लोकमत'च्या बातमीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वसन दिलं आहे.
हेही वाचा.....तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बाहेर पडू देणार नाही, मराठा क्रांतीचा इशारा
बाळंतीण महिला कोरोना पॉसिटिव्ह आढळून आल्यामुळे तिच्यावर कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, ती महिला रुग्णालयात गेली नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेला रुग्णालयात दाखल केले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. आता मुद्दा हा उपस्थित होतो की, स्री शासकीय रुग्णालयातून कोरोना पॉसिटीव्ह आल्यानंतर ऑटोमध्ये नातेवाईकांसोबत जाऊ देण्यास परवानगी कशी देण्यात आली. या गंभीर प्रकारची सखोल चौकशी होणे गरजेची असल्याची मागणी होत आहे.