नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 15 सप्टेंबर : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. बकाले यांना नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर रात्री उशीरा निलंबित करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता. याबाबत एसपींकडे मागणी देखील करण्यात आली होती. या अनुषंगाने गुरुवारी रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत. (मैदान ‘शिंदें’चं पण हवं उद्धवना, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लान बी!) दरम्यान, मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलिसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. तर, मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबन केलेच पाहीजे स्वराज्य संघटनेची मागणी आहे. पोलीस प्रशासन व गृह विभाने तात्काळ निलंबन नाही केलेतर आम्ही बकाले कामाला येऊ शकत नाही याचे नियोजन करणार आहोत, असा इशाराही स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







