आकाश गुळणकर
बीड, 1 जुलै : महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाड्यात मात्र अजून पाऊस समाधानकारक झालेला नाही. अनेक ठिकाणी दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई आहे. बीड जिल्ह्यातल्या पोखरी गावाने मात्र पाण्याचा थेंबथेंब वाचवून यावर उपाय काढला आहे.
पोखरी गावातल्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारकडून काही पैसे मिळाले. या पैशातून गावासाठी काहीतरी ठोस करावं, असं सिद्धेश्वर काळे या शेतकऱ्यांना सुचलं. त्यांनी गावातल्या लोकांना सोबत घेऊन जलसंवर्धानाची मोहीमच काढली.
'पळून गेलो नाही'
'आम्ही पळून गेलो नाही, परिस्थितीशी सामना करायचं ठरवलं', असं सिद्धेश्वर काळे सांगतात. ज्या गावात दुष्काळामुळे लोकांवर स्थलांतर करण्याची पाळी येते त्या गावात लोकांनी निर्धार केला आणि पाणी वाचवायचं ठरवलं. पोखरी गावाला गारपिटीच्या नुकसान भरपाईचे 11 लाख रुपये मिळाले होते. या पैशातून या गावातल्या लोकांनी पाण्याचं संवर्धन करायचं ठरवलं.
VIDEO: अख्खी मुंबई पाण्यात तुंबली, पाहा पावसाचे आताचे अपडेट
मराठवाड्यामधला बीड जिल्हा हा वर्षभर दुष्काळाशी सामना करत असतो. या जिल्ह्यात सरकारने पाणीपुरवठा करण्यासाठी 939 टँकर तैनात केले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पोखरी गावाने जय्यत तयारी केली होती.
पोखरी गावातले गोकर्ण कारंडे, वंदना बोंगाणे, अरुणा वाडेकर आणि गणेश दन्ने यांनीही 'पाणी फाउंडेशन'चं प्रशिक्षण घेतलं आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. गावातल्या टेकडीच्या भोवती त्यांनी खंदक खोदले. भूमिगत पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केलेला हा उपाय होता.
गावकऱ्यांचं श्रमदान
गावात ठिकठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आणि पाणी वाचवण्याच्या या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं. सुमारे 600 शेतकऱ्यांनी यासाठी आपल्याला मिळालेली नुकसान भरपाई देऊ केली. गावाबाहेर राहणाऱ्या चाकरमानी लोकांनीही या पाणीचळवळीसाठी मदत केली.
हा निधी जमा झाल्यावर श्रमदानाला सुरुवात झाली. गावातल्या महिला, पुरुष कामाला लागले. प्रत्येकाला व्हॉट्स अॅप ग्रुपवर कामं ठरवून देण्यात आली. गावात टँकर येत होताच. पण टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहायचं असं या गावाने ठरवलंच होतं.
गावकऱ्यांनी 8 एप्रिलपासून ते 28 मे पर्यंत तब्बल 50 दिवस मेहनत केली. यात बच्चेकंपनीही सामील झाली.
भूमिगत पाण्याची पातळी वाढली
एवढे दिवस खपून खोदलेल्या खंदकांमुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढली. त्यातच आता आलेल्या पावसाचं पाणीही या खंदकांमध्ये साठणार आहे. योग्य नियोजन आणि जिद्द, मेहनत असेल तर सततच्या दुष्काळाने हैराण झालेल्या गावामध्येही कसं पाणी खेळवता येतं हे पोखरीच्या गावकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. आता या गावाचं उदाहरण घेऊन जवळपासच्या गावांतही जलसंधारणाची कामं सुरू झाली आहेत. पोखरीमध्ये पडणारा पाऊस आता जमिनीत नीट जिरवला जातो आणि गावातल्या दुष्काळाच्या झळा कमी होणार म्हणून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद तरळत असतो.
==============================================================================================
SPECIAL REPORT : पहिला पाऊस...बघ तुला माझी आठवण येते का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pani foundation