पिंपरी चिंचवड, 18 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाउन वाढवण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे गुन्हेगारीचं प्रमाणही कमी झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. परंतु, पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड महाकालीच्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड महाकाली उर्फ राकेश ढकोलिया याचा 2010 मध्ये एन्काउंटर करण्यात आला होता. त्यानंतर महाकाली टोळी मार्फत अनेक बेकायदेशीर कामं करणाऱ्या महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया या घटनेत जागीच ठार झाला. रविवारी रात्री वाकड परिसरातील पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली ही घटना घडली. हेही वाचा - मुंबईतून गावी पोहोचले अन् 15 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू,घरातच ठेवला 6 दिवस मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगऱ्याची हत्या केल्या प्रकरणी आदम उर्फ गोट्या खान या संशयिताला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
डिंगऱ्या आणि आदम हे दारू पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते. दारू पित असताना त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगऱ्याला डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत डिंगऱ्या गंभीर जखमी झाला होता. मारहाण केल्यानंतर आदम घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिंगऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. हेही वाचा - जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा डिंगऱ्यावर नऊ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आलं होतं. मात्र, तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता. तर त्याची हत्या करणाऱ्या आदम विरोधातही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. संपादन - सचिन साळवे