Home /News /maharashtra /

साईबाबा जन्मस्थळ वाद आणखी चिघळणार, साई जन्मभूमी कृती समिती आक्रमक

साईबाबा जन्मस्थळ वाद आणखी चिघळणार, साई जन्मभूमी कृती समिती आक्रमक

साईबाबा जन्मभूमी प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिर्डीकरांनी घेतलेल्या भूमिकेवर पाथरीकर आता आक्रमक झाले आहेत

विशाल माने,(प्रतिनिधी) परभणी,23 जानेवारी: साईबाबा जन्मभूमी प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिर्डीकरांनी घेतलेल्या भूमिकेवर पाथरीकर आता आक्रमक झाले आहेत. शिर्डीच्या शिष्टमंडळाची बाजू एकूण घेतल्यानंतर आमचीही बाजू मुख्यमंत्र्यांनी ऐकणे गरजेचे आहे. एकतर्फी निर्णय घेतला असल्याचा आरोप साई जन्मभूमी कृती समितीने केला आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कृती समिती शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार असून या बैठकीतून पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे. शिर्डी येथील साईबाबाची पाथरी ही जन्मभूमी असल्याचा दावा पाथरीकरांनी केल्यानंतर शिर्डी विरूद्ध पाथरी अशा वादाला तोंड फुटले. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यावर शिर्डी येथील समितीने बाबांनी आपल्या जन्माविषयी आणि मूळ गावाविषयी कधीही सांगितले नाही, अशी भूमिका घेतली. त्याला समर्थन म्हणून शिर्डी बंद आंदोलनही केले. त्याला प्रत्युत्तर देताना पाथरी येथील साईबाबा मंदिरात महाआरतीचे आयोजन करून शिर्डीकरांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. यावर वादावादी सुरू असतानाच शिर्डीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर जन्मभूमीऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यात यावा, अशी भूमिका मांडली. मुख्यमत्र्यांनी यावर आपले समाधान केल्याचेही शिर्डीच्या शिष्टमंडळाने सांगत समाधान व्यक्त केले. पण पाथरीकरांना मात्र आपली बाजू मांडण्यासाठीही भेट न दिल्याने पाथरीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर राजकीय गटातून हालचाली होत असताना पाथरी येथील कृती समिती आता आक्रमक झाली आहे. साईबाबा यांचा जन्म पाथरीला झाला यावर ठाम आहेत. आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे आपण आपली बाजू कोर्टात मांडू आणि न्याय मिळवू, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Parbhani news

पुढील बातम्या