उस्मानाबाद, 10 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील दोन नंबरचे नेते होते. त्यांचे पक्षातील सर्व नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध होते. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळचे नेते मानले जायचे. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपचा हात पकडला. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 39 आमदारांना घेवून बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं. शिंदेंच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं. राज्यातील हे नवं सरकार स्थापन करण्यामागे भाजपचा देखील हात होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ते कबूल केलं आहे. दुसरीकडे युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी एक वेगळा दावा केला आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार होतील. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील आणि पंतप्रधान बनतील, अशी भीती भाजपला होती. त्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली, असा धक्कादायक दावा वरुण सरदेसाई यांनी केला आहे. वरुण सरदेसाई हे उस्मानाबादमध्ये युवा सेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ( ‘शिवसेनेतील असंतोषाचा फायदा घेतला, युती तोडल्याचा वचपा काढला’, देवेंद्र फडणवीसांची सर्वात स्फोटक मुलाखत ) उद्धव ठाकरेंनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या कोरोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील ते दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच राहिली तर 2024 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी भाजपवर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








