उस्मानाबाद, 03 ऑगस्ट : जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा म्हणजे धाराशिव लेणी (Dharashiv Caves). या लेण्यांकडे हातला देवी मंदिराकडून पायवाटेने, तसेच शहरालगतच्या बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. लेण्यांसमोर मराठा कालखंडातील एक शिव मंदिर आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणीप्रमाणे या लेणीला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी अजिंठा इथल्या लेण्यांच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितले जातं. पावसाने लेणीचे सौंदर्य खुलले असून पर्यटकही वर्षा सहलीसाठी (Rainy trips) लेणीवर गर्दी करत आहेत. उस्मानाबाद शहरापासून अवघ्या आठ किमी. अंतरावर एक प्राचीन लेणी आहे. ही लेणी धाराशिव शहराजवळ 6 व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी 11 लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आहेत. शिव, विष्णू या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात. जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह म्हणून या लेण्यांची ओळख आहे. बालाघाट डोंगररांगेतील एका घळीच्या दोन्ही बाजूंना एकूण सात लेणी खोदलेली आहेत. यांपैकी चार उत्तरेकडील भागात पश्चिमाभिमुख असून, तीन विरुद्ध दिशेला आहेत. आजपर्यंत अनेक विद्वानांनी या लेण्यांवर प्रकाश टाकलेला आहे. जेम्स बर्जेस यांनी 1876 साली सर्वप्रथम या लेण्यांचे वर्णन केले होते.
गुगल मॅपवरून साभार हेही वाचा-
लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची ‘बोलकी’ चित्रं
पावसाळ्यात या ठिकाणाला अधिक महत्त्व धाराशिव लेणी हे ठिकाण जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटनस्थळ आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. साहजिकच पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी अनेक पर्यटक आवर्जून भेट देत असतात. संपूर्ण बालाघाट हा पावसाळ्याच्या दिवसात हिरवी चादर नेसून या ठिकाणाचे सौंदर्य वाढवत असतो. हे निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी व धाराशिव लेण्यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी इतर जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
लेणी क्रमांक 1 हे उत्तरेकडील चार लेण्यांच्या ओळीतील पश्चिम टोकाला खोदलेले एक अर्धवट लेणी असून, त्यात दोन स्तंभ व अर्धस्तंभयुक्त व्हरांडा व अर्धवट खोदलेला मंडप आहे. द्वारावर गोलाकृती भागाच्या आतील बाजूस पार्श्वनाथाची मूर्ती आहे. लेण्याच्या ओवरीत प्रवेश करताना लागणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस गण कोरलेले आहेत. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला एक खोली व पोढी असून त्यात चौरसाकृती स्तंभ तसेच एक शिल्प व दोन चौमुख आहेत. हे लेणे सर्वांत विशाल असून, छतविरहित प्रकारयुक्त प्रांगण, व्हरांडा (ओवरी), स्तंभयुक्त मंडप व गर्भगृह अशी सर्वसाधारण रचना. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला एक खोली व पोढी असून त्यात चौरसाकृती स्तंभ तसेच एक शिल्प व दोन चौमुख आहे. मंडपाच्या दर्शनी भागाची बरीच पडझड झाली असून, बर्जेस यांनी नमूद करून ठेवलेली जैनशिल्पे, चैत्य गवाक्षे व इतर अलंकृत भाग सध्या अस्तित्वात नाहीत. जीन मूर्ती, लेणी क्रमांक 2 एका खोलीत कायोत्सर्ग मुद्रेतील जीन कोरण्यात आलेला आहे. गर्भगृहातील द्वारावर तीन सपाट शाखा आहेत. त्याच्या डोक्यावर तीन दलयुक्त छत्र आहेत. जवळच एक चौमुख ठेवलेला आहे. या चौकोनाकृती गर्भगृहात मध्यभागी प्रदक्षिणापथयुक्त पार्श्वनाथाची भव्य मूर्ती कोरलेली आहे. पार्श्वनाथांच्या डोक्यावर सप्तफणाधारी नाग आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चामरधारी सेवक व मालाधारी विद्याधर आहेत. या शिवाय या लेणीत काही सुटी शिल्पे आहेत. त्यामध्ये पाच चौमुख व एक पंचतीर्थिका दिसून येते. मंडपातील काही स्तंभांच्या शीर्षभागावर एका जिनासह काही भित्तचित्रांचे अवशेष दिसून येतात. दोन्ही बाजूस समोरासमोर एक-एक सिंह व दोन-दोन हरिण कोरले आहेत.
हेही वाचा-
खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report
लेणी क्रमांक 3 ही लेणी आकाराने थोडेसे लहान आहे. व्हरांड्यच्या स्तंभांना जोडणाऱ्या शीर्षपट्टीत चैत्यगवाक्षासह उत्कृष्ट कोरीव शिल्पे होती. ती सध्या अस्तित्वात नाहीत. व्हरांडा 18 मी. रुंद असून समोर 8 स्तंभ आणि २ अर्धस्तंभ आहेत. मंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखायुक्त असून यात 20 स्तंभ आहेत. मंडपात 14 खोल्या असून गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील खोलीत, मागील भिंतीत जिन कोरलेला आहे.
धाराशिव लेण्यांचा इतिहास या लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. इसवी सन 11 व्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या करकण्डचरयु या प्राकृत ग्रंथाच्या चौथ्या आणि पाचव्या भागात तगर या गावाजवळ असलेल्या लेण्यांबद्दलचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापुरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापुरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेऊन जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तेथील डोंगर माथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली. ती आणून त्याने त्या मूर्तीची लेण्यात प्रतिष्ठापना केली. इतकंच नाही तर राजाने तेथे या लेण्याच्या वरील बाजूला अजून दोन लेणी खोदली अशी माहिती इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.