उस्मानाबाद, 2 ऑक्टोबर : स्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. मंगल गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत. मंगल गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे आणि अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय.
( सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा ) दरम्यान निलंबन करताना एसटी विभागाने फक्त डेपोमधील बोर्डवर नोटीस लटकवली आहे. त्यात निलंबन का केले? याचा उल्लेख करण्यात आला नाही. यावर ‘न्यूज 18 लोकमत’ने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत. तर मी एसटीच्या विरोधात काहीच केले नसून केवळ माझी बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केला असल्याचा आरोप महिला कर्मचारीने केला आहे.